अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदीनी छाप पाडली आहे. अफगाणिस्तानसंदर्भातील चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क मोदींची नक्कल केली. मोदींच्या हिंदी बोलण्याच्या शैलीचे त्यांनी अनुकरण केले.

‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकेतील इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याबाबत नुकताच निर्णय घेण्यात आला. अफगाणिस्तानमध्ये आणखी एक हजार सैनिकांची तुकडी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्याचे प्रमाण पुन्हा वाढवले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या होत्या. ओबामा यांच्या काळात साडे सहा हजार सैनिक अफगाणिस्तानमध्ये होते. तर सध्या हेच प्रमाण १४ हजारपर्यंत पोहोचले आहेत.

अफगाणिस्तानबाबत चर्चा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा उल्लेख केला. ‘कोणताही फायदा नसताना अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी जे योगदान दिले, ते अन्य कोणत्याही देशाने दिलेले नाही’ असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानाचा उल्लेख ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान केला. विशेष म्हणजे हे विधान करताना ट्रम्प यांची शैली आणि आवाज हुबेहुब मोदींसारखा होता, असे या बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या वृत्ताबाबत व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात अनेकदा दुरध्वनीवर चर्चा आणि प्रत्यक्ष भेट झाली आहे. या दोघांमधील मैत्रीची नेहमीच चर्चा रंगते. मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदींचा उल्लेख ‘माझे खरे मित्र’ असा केला होता. अफगाणिस्तानमध्ये विकासकामात भारताने मोलाची भूमिका निभवावी, असे ट्रम्प यांची भूमिका आहे.