अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेव्हिड मालपास यांना नामांकित केले आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार वॉल स्ट्रीटचे माजी अर्थशास्त्रज्ञ राहिलेले मालपस हे सध्या अमेरिकन सरकारच्या वित्त विभागात आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे अंडर सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहेत. डेव्हिड मालपस हे जागतिक बँकेचे मोठे टीकाकार राहिले आहेत.

बुधवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जे देश खूप गरीब आहेत, त्यांना आर्थिक मदतीची मोठी गरज आहे. अशा देशांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मालपास प्रयत्न करतील.  मालपास हे अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

अशा धोरणांचा अवलंब केला जाईल, ज्यामुळे जागतिक बँक जगभर गरिबीविरोधात लढा देऊ शकेन आणि आर्थिक संधी वाढतील, असे मालपस यांनी सांगितले. मालपास यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास ते दक्षिण कोरियाचे जिम याँग किम यांचे स्थान घेतील. जिम यांनी नुकताच राजीनामा दिला होता. २०१६ मध्ये मालपस यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आर्थिक सल्लागाराचे काम केले होते.

दरम्यान, भारतीय वंशाच्या पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नुयी याही जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. १९४९ पासून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड अमेरिका करते. किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ वर्ष २०२२ मध्ये संपणार होता. अनेक प्रकरणांमध्ये ट्रम्प प्रशासनाबरोबरील मतभेदामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.