अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी आणि एल-१ व्हिसावर बंदी आणण्याच्या वृत्ताला शनिवारी दुजोरा दिला. यासंबंधी आज अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्याच्या मदतीने अमेरिकेतील कंपन्यांत भारतासह इतर देशांचे परदेशी कर्मचारी काम करू शकतात. तंत्रकौशल्य गरजेच्या असलेल्या पदांवर या लोकांना नोकऱ्या मिळत असतात. एच-१ बी व्हिसावर निर्बंध आल्याने हजारो भारतीयांना फटका बसण्याची शक्यता आहे.

ट्रम्प प्रशासन व्हिसा रद्द करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यासंबंधी Fox News ने डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं असता त्यांनी आम्ही उद्या किंवा परवा व्हिसासंबंधी घोषणा करु शकतो अशी माहिती दिली. यामुळे अनेक लोकांना आनंद होणार असल्याचा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. पण करोनाशी लढताना लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अमेरिकेत बेरोजगारी वाढत असल्यानेच हा निर्णय घेत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. अमेरिकेत अनेक लोक नोकरीच्या शोधात आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. या निर्णयात काही अपवाद किंवा सूट असणार का असं विचारण्यात आलं असता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या व्यवसायांमधील कामगारांचा प्रवाह सुरक्षित ठेवण्यासाठी काही निर्णय घेतले जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं.