गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद वाढत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या काही नागरिकांवर अमेरिका प्रवेशावर बंदी घालण्याची घोषणा केली. तसंच चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या गुंतवणुकीच्या नियमदेखील अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनच्या विरोधात मोठी पावलं उचलण्यासाठी तयार करण्यात आलेलं विधेयक सादर करण्यात आलं होतं.

चीनच्या नव्या संरक्षण कायद्याच्याविरोधात हाँगकाँगसोबत विशेष ट्रेड डिल संपुष्टात आणणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. शुक्रवारी माध्यमांना संबोधित करताना त्यांनी या घोषणा केल्या. तसंच हाँगकाँगमधील प्रवसासाकरिता अमेरिकन नागरिकांसाठी एक नवी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे चीनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येक आहे.

संपूर्ण जगाला चीनकडून उत्तर हवं आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा करोनाला वुहान व्हायरस असं संबोधलं. “चीननं या व्हायरसची माहिती लपवल्यामुळेच तो संपूर्ण जगात पसरला. या व्हायरसमुळे अमेरिकेतील १ लाख लोकांचे प्राण गेले. तर जगभरातही लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले,” असं ट्रम्प म्हणाले. “चीनने अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची कमाई केली. परंतु आमच्याकडच्या लोकांना कधी नोकरी दिली नाही. चीननं जागतिक व्यापार संघटनेला दिलेल्या वचनबद्धतेचेही उल्लंघन केलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

अवैधरित्या दावा

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन अवैधरित्या दावा करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी धोकादायक ठरू शकते. याव्यतिरिक्त चीननं हाँगकाँगबाबत दिलेलं आश्वासनही तोडलं, असं ट्रम्प म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेतून माघार

“जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णत: चीनची पकड आहे. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडत आहे,” असं ट्रम्प म्हणाले. “सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटना करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरली. वर्षाला केवळ ४ कोटी डॉलर्सची मदत करूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचं वर्चस्व आहे, त्याच्या तुलनेत अमेरिकेकडून ४५ ते ५० कोटी डॉलर्सची मदत केली जात होती. परंतु संघटना आवश्यक त्या सुधारणा करण्यास अपयशी ठरली. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत,” असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा जो निधी थांबवण्यात आला आहे, तो जगातील अन्य आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.