अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. ट्रम्प यांनीच आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प हेलिकॉप्टरमधून वॉल्टर रिड लष्कर रुग्णालयात दाखल होण्यासाठी रवाना झाले. याआधी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला.

या व्हिडीओत डोनाल्ड ट्रम्प आपली प्रकृती चांगली असून, सर्व योग्य रितीने पार पडेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहित त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्पही करोनाबाधित आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा आपण मास्क वापरणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आता करोनाची लागण झाल्याने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला फटका बसला आहे. ट्रम्प दाम्पत्याला सौम्य लक्षणं असली तरी ट्रम्प यांचे वजन अधिक असल्याने त्यांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

आणखी वाचा- ‘या’ तीन कारणांमुळे पत्नीपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी करोना जास्त घातक ठरु शकतो; डॉक्टरांनी दिला इशारा

कार्यकाळातच अध्यक्षांना गंभीर धोका निर्माण होण्याची काही दशकांतील ही पहिलीच घटना आहे, असे सीएनएनच्या वृत्तात म्हटलं आहे. ट्रम्प ७४ वर्षांचे असल्याने अतीजोखमीच्या गटात मोडतात. ट्रम्प यांना करोना झाल्याचा परिणाम शेअर बाजारावरही पहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक ३ नोव्हेंबरला होत आहे. पण करोना झाल्याने प्रचार दौऱ्यांवर बंधनं आली आहेत.