अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर करोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाइन प्रक्रिया सुरु केली असल्याचं सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे, “मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोविड पॉझिटिव्ह आढळले आहोत. आम्ही लवकरच क्वारंटाइन प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. आम्ही एकत्र यामधून बाहेर पडू”. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत आपली सल्लागार होप हिक्सला करोनाची लागण झाली असून आपण क्वारंटाइन होत असल्याची माहिती दिली होती. “अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक…फर्स्ट लेडी आणी मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.

होप हिक्स राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या पहिल्या चर्चेसाठी त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित होत्या. यानंतर व्हाइट हाऊसकडून यासंबंधी निवेदन प्रसिद्ध करत राष्ट्राध्यक्ष आपली तसंच आपल्याला समर्थन असणाऱ्यांची आणि अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्याची गांभीर्यानं दखल घेत असल्याचं म्हटलं होतं.