अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच अखेरच्या प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोहोचू लागला आहे. दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या व्हर्च्युअल वादविवाद चर्चेत आपण सहभागी होणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. करोनाची लागण झाल्यानंतर काही दिवस उपचार घेऊन ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले होते. त्यानंतर त्यांनी पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअली पार पडणाऱ्या वादविवाद चर्चेत आपण सहभागी होणार नसल्याचं ट्रम्प म्हणाले. माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तानुसार कमिशन ऑन प्रेसिडेन्शिअल डिबेटनं १५ ऑक्टोबर रोजी मियामी येथे पार पडणारी वादविवाद चर्चा व्हर्च्युअली घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा- मिशेल ओबामांकडून ट्रम्प यांच्यावर वर्णद्वेषाचा आरोप; म्हणाल्या, “ते राष्ट्राध्यक्ष…”

दुसरी प्रेसिडेन्शिअल वादविवाद चर्चा ही टाऊन मिटींगच्या धर्तीवर घेतली जाणार आहे. ज्यामध्य़े उमेदवार रिमोट लोकेशनहून यात सहभागी होतील, असं गुरूवारी कमिशन ऑन प्रेसिडेन्शिअल डिबेटनं म्हटलं होतं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी आपण यात सहभागी होणार नसल्याचं म्हटलं होतं. “कमिशननं वादविवाद चर्चेची पद्धत बदलली आहे आणि आम्ही ते स्वीकारणार नाही. मी त्यांना (जो.बायडेन) यांना पहिल्या चर्चेत पराभूत केलं होतं. दुसऱ्या चर्चेतही सहजरित्या मी त्यांना पराभूत करू शकतो. व्हर्च्युअल वादविवाद चर्चेत मी वेळ घालवू इच्छित नाही,” असं ट्रम्प म्हणाले.

आणखी वाचा- … तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळायला हवी : जो बायडेन

यानंतर जो बायडेन यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “कमिशननं दिलेला सल्ला आम्ही मानतो. आम्हाला माहित नाही राष्ट्राध्यक्ष पुढे काय करतील. प्रत्येक सेकंदाला त्यांचं मन बदलत असतं. अशा परिस्थितीत मी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं अयोग्य असेल,” असं बायडेन म्हणाले.