अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे प्रतिपादन

भारत आणि अमेरिका मूलतत्त्ववादी इस्लामी दहशतवादापासून लोकांचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहेत. दोन्ही देशांमध्ये संरक्षण संबंध विस्तारत असून मंगळवारी तीन अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ मेळाव्यात बोलत होते. भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराची पूर्वतयारी सुरू असल्याचेही ट्रम्प म्हणाले. कुठल्याही देशाला त्याच्या सीमांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. आपण सत्तेवर आल्यानंतर दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानवर सतत दबाव आणल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांचे स्वागत केले. नंतर ट्रम्प यांनी पत्नी, कन्या इव्हान्का, जावई जॅरेड कुश्नर यांच्यासह साबरमती आश्रमास भेट दिली. नंतर ते मोटेरा स्टेडियमवर आले. तेथे सुमारे सव्वा लाख नागरिकांसमोर बोलताना ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. ते म्हणाले, मोदी हे देशासाठी दिवस-रात्र काम करणारे अपवादात्मक नेते आहेत.

दहशतवादाविषयी ट्रम्प म्हणाले, ‘‘भारत आणि अमेरिका दहशतवादी आणि मूलतत्त्ववादाशी मुकाबला करण्यास वचनबद्ध आहेत. त्यामुळेच अमेरिका पाकिस्तानला तेथील दहशतवादी गटांवर कारवाई करण्यास भाग पाडत आहे.’’ दोन्ही देशांमध्ये मंगळवारी तीन अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ३०० कोटी रुपये) संरक्षण करारांवर शिक्कामोर्तब करणार आहोत, असेही ट्रम्प यांनी जाहीर केले.

अमेरिका हा भारताचा प्रमुख संरक्षण भागीदार बनला आहे. जगात आमची ही आघाडी आम्ही मजबूत करीत आहोत. दोन्ही देशात चांगल्या व्यापार करारासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मोदी वाटाघाटी करण्यात चांगले आहेत यात शंका नाही, अशा शब्दांत ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले.

मोदींची प्रशंसा

मोदी यांची प्रशंसा करताना ट्रम्प म्हणाले, भारतीय व्यक्ती कठोर परिश्रमाने काय साध्य करू शकते याचे पंतप्रधान मोदी हे उदाहरण आहे. ते एकेकाळी चहा विकत होते, पण नंतर त्यांनी मोठी भरारी घेतली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भरघोस यश मिळवले.

भारत-अमेरिका मैत्री शाश्वत!

भारत आता जगातील एक मोठी अर्थव्यवस्था असून त्यानेच मानवतेला आशेचा दीप दाखवला आहे आणि हा देश आता मोठी आर्थिक शक्ती बनला आहे. दडपशाहीने एखादा देश मोठा होणे आणि लोकांचे स्वातंत्र्य अबाधित राखून मोठा होणे यात फरक आहे, भारताने सर्व स्वातंत्र्ये अबाधित राखून मोठेपण मिळवले आहे. भारत-अमेरिकेतील मैत्री नैसर्गिक आणि शाश्वत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची आपल्या राजवटीत भरभराट झाली असा दावा करून ट्रम्प म्हणाले, भारत आणि अमेरिका यांची मैत्री इतर देशांसारखी नसून ती एका वेगळ्या उंचीवरची आहे.

भारताच्या सांस्कृतिक बहुविधतेचा उल्लेख करताना त्यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि  शोले या चित्रपटांचा तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा उल्लेख केला.

भारताच्या धार्मिक सलोख्याची प्रशंसा

अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे. अमेरिका भारताशी एकनिष्ठही आहे, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी मुक्तकंठाने भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्याचे राज्य, प्रत्येक माणसाचा सन्मान, त्याचबरोबर धार्मिक सलोखा ही भारताची मोठी परंपरा आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी भारताची प्रशंसा केली.

अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प मेळाव्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या कबिल्यासह आग्य््रााला दाखल झाले. ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, कन्या इव्हान्का आणि जावई कुश्नर यांच्यासह जगप्रसिद्ध ताज महालला भेट दिली.

 

ट्रम्प म्हणाले,

– अमेरिका व भारत हे अवकाश संशोधनात संयुक्तपणे काम करतील. इस्रोची चांद्रमोहीम उत्कं ठावर्धक आहे, भारतीय व्यक्तीला अंतराळात पाठवण्याचे प्रयत्नही कौतुकास्पद आहेत.

– भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार ४० टक्क्यांनी वाढला असून भारत आता अमेरिकी निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ आहे. भारत अमेरिकेचा मोठा निर्यात आणि संरक्षण भागीदार आहे.

– अमेरिकेची प्रगती भारतासाठी लाभदायी आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कधी नव्हे एवढी भक्कम आहे. भारताशी मोठा व्यापार करार करण्याची पूर्वतयारी आम्ही करीत आहोत.

– भारताला अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स देण्यासाठी मंगळवारी तीन अब्ज डॉलर्सचा करार करणार आहोत.

 

ट्रम्प यांचे विरोधकांवर टीकास्त्र

वॉशिंग्टन / आग्रा : भारतभेटीवर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या नियोजित निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्ष – डेमोक्रॅटिक पार्टीवर टीकास्त्र सोडले. डेमोक्रॅटिक पार्टीचे सिनेटर बर्नी सँडर्स अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील आपले प्रतिस्पर्धी असू शकतात, असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले. ते म्हणाले, डेमोक्रॅटिक पार्टीचे बर्नी सँडर्स इतरांपेक्षा तगडे उमेदवार असूनही त्यांचे नेते त्यांना जिंकू देणार नाहीत. त्यांच्या पक्षाचे नेते त्यांना उमेदवारीपासून रोखू शकतात.

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांच्यात मंगळवारी दुपारी हैद्राबाद हाऊसमध्ये बैठक होईल. चर्चेत ट्रम्प धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिका भारत यांच्यातील ३०० कोटी डॉलर्सच्या रुपयांच्या संरक्षण करारावरही दोन राष्ट्रप्रमुख शिक्कामोर्तब करतील.