अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज, सोमवारी ३६ तासांच्या भारतभेटीवर येत आहेत. भेटीच्या पहिल्या दिवशी, २४ फेब्रुवारीला ट्रम्प  हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण करतील.

डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतभेटीवर येत आहेत. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया याही येत आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील.  अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी ११.४० वाजता ट्रम्प आणि मेलानिया यांचे आगमन होईल. त्यांतर ट्रम्प आणि मोदी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागी होतील. तेथे लाखभर लोक उपस्थित असतील, असे सांगण्यात आले. ट्रम्प दाम्पत्य साबरमती गांधी आश्रमाला भेट देण्याची शक्यता असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. साबरमती नदीच्या किनाऱ्यावर ट्रम्प आणि मोदी यांच्या प्रतिमा असलेली मोठमोठी होर्डिग्ज लावण्यात आली आहेत.

आयात कर, धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा?

ट्रम्प यांनी मोदी हे आपले खास मित्र असल्याचे म्हटले असले तरी भारताने आयात कर लादून अमेरिकेचे नुकसान केल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार तूट कमी करण्याच्या दिशेने उपाययोजना करणे हाच या भेटीचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येते. धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर चर्चा करताना ट्रम्प ‘सीएए’ आणि एनआरसीचा विषय उपस्थित करतील असे मानले जाते.

दौऱ्याचा पहिला दिवस

* डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांचे सोमवारी ११.४० वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल.

* ट्रम्प दाम्पत्याची १२.१५ वा. साबरमती गांधी आश्रमाला भेट देण्याची शक्यता असल्याने तेथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

* ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी १.०५ वा. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण होईल.

* ट्रम्प आणि मेलानिया दुपारी ३.३० वा. आग्य्राला प्रयाण करतील आणि सायंकाळी ५.१५ वा. जगप्रसिद्ध ताज महालला भेट देतील.