अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  आज आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर हे देखील आलेले आहेत. ट्रम्प यांनी सर्वात अगोदर साबरमती आश्रमाला भेट दिली व त्यानंतर मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांचे लाखो नागरिकांनी जोरदार स्वागत केले. हा कार्यक्रम आटोपून ट्रम्प सध्या आग्रा येथे ताजमहल पाहण्यासाठी आलेले आहेत. ताजमहल आम्हाला प्रेरणा देतो, अशी भावाना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

“ताजमहल आम्हाला प्रेरणा देतो. भारतीय संस्कृतीच्या संपन्न व वैविध्यपूर्ण सौंदर्याचे ते कालातीत प्रतीक आहे. धन्यवाद भारत.” असा अभिप्राय ट्रम्प यांनी ताजमहाल पाहणी दरम्यान तेथील अभ्यागत पुस्तिकेवर नोंदवला आहे.

यावेळी ताजमहलमधील ‘डायना बेंच’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमरवरी बाकावर बसून ट्रम्प आणि मेलेनिया यांनी फोटोसेशनही केले. या अगोदर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केलं.

भारतात दाखल झाल्यानंतर  ट्रम्प यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला सपत्नीक भेट दिली. तिथे त्यांनी चरख्यावर सूत कताई केली. यानंतर तिथून निघताना आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत त्यांनी ‘माझे जिवलग मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, अविस्मरणीय भेट’ असा संदेश लिहिला होता.

यानंतर मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमानंतर ट्रम्प यांनी,  भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. अशी  भावना व्यक्त केली होती. यावेळी, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचंही  कौतुक केलं. शिवाय भारत-अमेरिका संबंधावरही भाष्य केलं.