भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणारे जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली आहे. कॅलिफोर्नियाच्या सिनेटर असणाऱ्या कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची आई तामिळ आहे. अमेरिकेत यावर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. असोसिएटड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे थेट उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळणे, ही खूप मोठी बाब आहे. जो बिडेन यांनी कृष्णवर्णीयांची मते मिळवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. कमला हॅरिस कृष्णवर्णीयांची मते डेमोक्रॅटिक पक्षाकडे वळवू शकतात. “उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मी खूप गौरवाने, सन्मानाने कमला हॅरिस यांचे नाव जाहीर करत आहेत. त्या निर्भीड, देशाच्या उत्तम सेवक आहेत” अशा शब्दात बिडेन यांनी कमला हॅरिस यांचे कौतुक केले. ‘आम्ही दोघे मिळून ट्रम्प यांचा पराभव करु’ असे बिडेन यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- कोण आहेत अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या कमला हॅरीस? जाणून घ्या…

५५ वर्षीय कमला हॅरिस पहिल्यांदाच सिनेटर म्हणून निवडून आल्या आहेत. पक्षातील त्या महत्त्वाच्या व्यक्ती असून थेट नंबर दोन पदापर्यंत त्या पोहोचल्या आहेत. अमेरिकेत सध्या करोना व्हायरसने थैमान घातले आहे. करोनामुळे आतापर्यंत तिथे दीडलाखापेक्षा जास्त नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याचे ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.