मंगळवारी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. करोनाचं संकट असलं तरी यादरम्यान मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगाही पाहायला मिळाल्या होत्या. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. परंतु या निवडणुकांमध्ये जो बायडेन यांचं पारडं जड असल्याचंही म्हटलं जात आहे. आहे. जर बायडेन यांना या निवडणुकीत विजय मिळाला तर डोनाल्ड ट्रम्प हे १९९२ नंतर प्रथमच दुसऱ्यांदा निवडणूक न जिंकणारे राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.

दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी टपाली मतदानावरून आक्रमक पवित्रा घेत निवडणुकांचा निकाल मान्य न करता न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. काहीही निकाल लागला तरी तो अमान्य करू असेच ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पेनसिल्वानियातील टपाली मतदान जर मतमोजणीनंतर तीन दिवसांनी मोजले जाणार असेल तर आपण न्यायालयात जाणार आहोत असं ट्रम्प यांनी सांगितलं.

आपणच विजयी होऊ असा विश्वास अध्यक्ष ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला होता. दरम्यान ह्यूस्टन येथील १ लाख २७ हजार टपाली मते मोजणीतून बाद करण्याची रिपब्लिकन पक्षाची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. मतदानाच्या दिवशी गैरप्रकार होऊ नयेत यासाठी व्हाइट हाऊसभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण सोळा कोटी मतदानातून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार हे ठरणार आहे. एकूण पात्र मतदार २४ कोटी आहेत. इ.स. १९०० नंतर प्रथमच सोळा कोटी मतदान होण्याची शक्यता फ्लोरिडा विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक मायकेल मॅकडोनाल्ड यांनी वर्तवली होती.
करोनाच्या साथीत झालेले हाल, २ लाख २९ हजार करोना बळी, कृष्णवर्णीयांवरील पोलिसी अत्याचारातून झालेल्या दंगली, चीनशी घेतलेला संघर्षांचा पवित्रा व आर्थिक नाकेबंदी, इराणशी उभा दावा, भारताची दक्षिण चीन सागरात चीनला रोखण्यासाठी भलामण या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत. २०१६ पेक्षा यावेळी मतदान जास्त असणार आहे. २०१६ मध्ये ५ कोटी मतदारांनी आधीच मतदान केले होते, यावेळी १० कोटी मतदारांनी आधीच टपालाने मतदान केले आहे.

बायडेन यांचं पावसात भाषण

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचं फ्लोरिडा येथील भाषण सध्या चर्चेचा विषय ठरला होता. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू पावसात सुरू असलेल्या प्रचारसभेचा फोटो शेअर केला होता. “वादळ जाईल आणि नवा दिवसही येईल,” असं कॅप्शन बायडेन यांनी या फोटोला दिलं होतं. फ्लोरिडामध्ये बायडेन यांच्या सुरू असलेल्या प्रचारादरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. परंतु बायडेन यांनी आपलं भाषण न थांबवता पावसातही ते सुरू ठेवलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय घेऊन याचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेला आलेले लोक आपल्या कारमध्ये बसून बायडेन यांचं भाषण ऐकत होते. दरम्यान, बायडेन यांनी अमेरिकेतील नागरिकांची मनं जिंकली असल्याचं म्हटलं जात होतं.