अमेरिकी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीची मतमोजणी आज

अमेरिकेचे नवे अध्यक्ष निवडण्यासाठी मंगळवारी मतदानाला सुरुवात झाली. सुमारे १२ कोटी अमेरिकी मतदार महासत्ता कोणाची हे ठरवण्यासाठी आपला हक्क बजावण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री देशात मतदान थांबून बुधवारी मतमोजणीला प्रारंभ होईल.

अमेरिकेतील बहुतांशी राज्यांत सकाळी ६ ते ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र न्यू हँपशायरमधील काही गावांत मध्यरात्रीपासूनच मतदानाला सुरुवात झाली. त्याशिवाय अमेरिकेत टपालाने आगाऊ मतदान करण्याची सोय आहे. अशा प्रकारे आतापर्यंत आजवरचे सर्वात विक्रमी मतदान झाले आहे.

यंदाच्या अमेरिकी निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे दोन अमेरिकी अंतराळवीरांनी अंतराळयानातून मतदान केले आहे.शेन किंब्रो आणि केट रुबीन्स अशी त्यांची नावे आहेत.

टेक्सासमध्ये १९९७ साली संमत केलेल्या कायद्यानुसार तशी तांत्रिक सोय करण्यात आली होती. त्याचा वापर करून त्याच वर्षी दोन अंतराळवीरांनी तसे मतदान केले होते.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी न्यूयॉर्कमधील चपाक्वा येथील डग्लस ग्रॅफलीन एलिमेंटरी स्कूल येथील मतदान केंद्रावर पती आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासह मतदान केले. तत्पूर्वी देशात विविध मार्गानी ४६ दशलक्ष नागरिकांनी मतदान केले होते. हा आजवरचा सर्वात मोठा आकडा आहे. २०१२ सालच्या निवडणुकीत अशा प्रकारे ३२.३ दशलक्ष नागरिकांनी मतदान केले होते.  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे मॅनहटनमधील पीएस ५९ एलिमेंटरी स्कूल येथे मतदान केंद्रावर आपला हक्क बजावणार होते.  एकंदर सर्वत्र मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. विशेषत: हिस्पॅनिक मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर उत्साहाने गर्दी केली होती.

देशातील सरकारी यंत्रणा चांगले प्रशासन देण्यात अपयशी ठरली आहे. तिने देशवासीयांना गरिबी दिली आहे आणि जगाला संकटातच ढकलले आहे. देशातील प्रस्थापित प्रसारमाध्यमे आणि राजकारण्यांच्या अभद्र युतीने देशाचे रक्त आटवले आहे. अशा अपयशी व्यवस्थेला दूर करून सुप्रशासनाची कास धरण्याची वेळ आली आहे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन मतदारांना केले. तर  हिलरी क्लिंटन यांना निवडून दिले नाही तर माझ्या आठ वर्षांच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेने जी प्रगती केली आहे ती फोल ठरेल. त्यामुळे क्लिंटन यांनाच विजयी करा, असे आवाहन बराक ओबामा यांनी  केले.