अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. आज मतमोजणी सुरु आहे. पुढच्या काही तासात अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असेल ? ते स्पष्ट होईल. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी डेलावर, या आपल्या गृहराज्यात विजय मिळवला आहे, त्याशिवाय मेरीलँड, मॅसाच्युसेटस, वरमाँट, कनेक्टिकट, व्हर्जिनिया, न्यू मेक्सिको, न्यू यॉर्क आणि न्यू जर्सी या राज्यात विजय मिळवला आहे.

जॉर्जिया, ओहायो, टेक्सास आणि फ्लोरिडा ही सर्वात महत्त्वाची राज्ये आहेत. या राज्यांचा असा एक ठरलेला मतदानाचा पॅटर्न नाहीय. या राज्यातील मतदार याआधीच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला मतदान केले होते, त्यालाच मतदान करतील हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही. बायडेन इलेक्टोरल मतांमध्ये आघाडीवर आहेत पण महत्त्वाच्या फ्लोरिडात ट्रम्प आघाडीवर आहेत.

अ‍ॅरीझोना, ओहायो, लोवा, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, पेंसिल्वेनिया, विस्कोंसिन ही राज्ये सुद्धा पुढच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नॉर्थ कॅरोलिना आणि फ्लोरिडामध्ये अटी-तटीची लढाई सुरु आहे. सध्याचे जे निकाल आहेत, त्यानुसार डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन २०० इलेक्टोरल मतांनी आघाडीवर आहेत. बहुमतासाठी २७० इलेक्टोरल मते आवश्यक आहेत. वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, ओरेगनमध्ये बायडेन यांनी विजय मिळवला आहे.