अमेरिकेचा इशारा
पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कवर कारवाई करण्यात जी कुचराई केली आहे ती चिंताजनक असून हा प्रश्न आम्ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ पातळीवर उपस्थित केला आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया एलिझाबेथ थ्रुडो यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तान सरकार अफगाणिस्तानातील तालिबानवर कारवाई करीत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे व तो प्रश्न वेळोवेळी पाकिस्तानकडे उपस्थितही केला आहे.
अफगाणिस्तानात या आठवडयात झालेल्या हल्ल्यात ७० जण ठार झाले होते, त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात कुचराई करीत आहे असा त्याचा अर्थ जागतिक पातळीवर लावला गेला असून अमेरिकेने ही चिंता बोलून दाखवली आहे. आम्ही पाकिस्तान सरकारला तालिबानी गटांवर कारवाई करताना पाकिस्तानी तालिबान व अफगाणी तालिबान असा फरक न करण्याचा इशारा दिला आहे. हक्कानी गटावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी अमेरिकेची भूमिका असल्याचे एलिझाबेथ यांनी सांगितले. जी वचने दिली त्याची पूर्तता करा, दहशतवाद्यांवर कारवाई झालीच पाहिजे.