तालिबानी दहशतवादी संघटनेने बंधक बनवलेल्या अमेरिकी- कॅनडाच्या दाम्पत्याची पाच वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. अमेरिकेच्या वाढत्या दबावासमोर नमते घेत पाकिस्तानने या दाम्पत्याची सुटका केल्याचे सांगितले जाते. तालिबानशी संबंधित हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी या दाम्पत्याचे अपहरण केले होते.

अफगाणिस्तानमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कॅटलान कोलमन आणि जोशूआ बॉयले या दाम्पत्याचे २०१२ मध्ये काबूलमधून अपहरण करण्यात आले होते. कॅटलान ही अमेरिकेची नागरिक असून तिचा पती जोशूआ हा कॅनडाचा नागरिक आहे.  हे दाम्पत्य अफगाणिस्तानमध्ये कसे पोहोचले हे अजूनही अस्पष्ट आहे. त्यांच्या टूर प्रॉग्रेममध्ये अफगाणिस्तानचा समावेश नव्हता. मध्य आशियात फिरत असताना काही अफगाणी नागरिकांशी त्यांची ओळख झाली. अफगाणमध्ये साहसी पर्यटनासाठी संधी असल्याचे दाम्पत्याला सांगण्यात आले असावे आणि यामुळेच ते अफगाणिस्तानमध्ये पोहोचले असावे, असा अंदाज या दाम्पत्याच्या नातेवाईकांनी २०१४ मध्ये व्यक्त केला होता. तालिबानी दहशतवाद्यांच्या कैदेत असताना कॅटलान कोलमनने मुलांनाही जन्म दिला.

हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेने दाम्पत्याचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवले होते. हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने मदत केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. २००१ नंतर हक्कानी नेटवर्कने तालिबानसाठी काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हक्कानी नेटवर्क आणि अन्य दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेने दबाव टाकला होता. कारवाई न केल्यास मदत थांबवण्याचा इशाराही ट्रम्प प्रशासनाने दिला होता. अमेरिकेच्या दबावामुळेच पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या तावडीतून या दाम्पत्याची सुटका केल्याचा अंदाज आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी गुरुवारी अफगाणिस्तान- पाकिस्तान सीमारेषेवर कारवाई केली. एका कारमध्ये संशयास्पद हालचाली सुरु असल्याचे निदर्शनास आले. कारमधील ट्रंकमध्ये बॉयले आणि त्याचे कुटुंब होते. दाम्पत्याच्या सुटकेसाठी खंडणी देण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. सुटकेनंतर दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांना हेलिकॉप्टरने इस्लामाबादमधील अमेरिकेच्या दुतावासात नेण्यात आले.