अमेरिकेकडून पाकिस्तानला होणारा शस्त्रपुरवठा आणि लष्करी साहाय्यास गेल्या वर्षभरात चांगलीच चालना मिळाल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात जाहीर झालेल्या एकूण दस्तावेजांनुसार अमेरिकेने पाकिस्तानसमवेत केलेल्या ‘परकीय लष्करी विक्री’ करारानुसार, सन २००२ ते २०१२ या दशकभरात सुमारे ५.२ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा व्यवहार झाल्याचे ‘पॅण्टेगॉन’ने म्हटले आहे. अमेरिकेच्या या चालीमुळे दक्षिण आशियात पुन्हा शस्त्रस्पर्धेस तोंड लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकी फौजांनी मे २०११ या वर्षी अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनचा खातमा केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या लष्करी साहाय्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील लष्करी स्तरावरील सहकार्य पूर्ववत होण्याचेही स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
पाकिस्तानला गेल्या वर्षभरात अमेरिकेकडून लष्करी कामासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त १५० रेडियो संच, ‘एफ-१६’ जातीची ३५ अत्याधुनिक विमाने पुरविण्यात आली आहेत. अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला सन २००१ पासून परकीय लष्करी आर्थिक साहाय्याद्वारे तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सची मदत मंजूर केली. त्यानंतर दोन अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम त्यांना देण्यात आली. पाकिस्तानच्या लष्करी सामग्रीचे दीर्घकालीन आधुनिकीकरण करण्याच्या हेतूने या रकमेचा वापर करण्यात आला आहे. पाकिस्तानला अमेरिकेने संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या ‘एक्सेस डिफेन्स आर्टिकल्स’सारख्या सामग्रीचाही पुरवठा केल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये ‘एफ-१६ए/बी’ जातीची १६ लढाऊ फाल्कन विमाने, ‘टी-३७’ जातीची लष्करी प्रशिक्षण देणारी ५९ जेट विमाने आदींचा समावेश आहे. याखेरीज, पाकिस्तानला अमेरिकेकडून अन्य लष्करी मदतही मोठय़ा प्रमाणावर मिळण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच अन्य कार्यक्रमांतर्गतही पाकिस्तानच्या दोन हजारांहून अधिक लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेने आर्थिक मदत दिली आहे.