इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप, २०१८ पर्यंत सदस्य राहण्याचा निर्णय

संयुक्त राष्ट्रांची सांस्कृतिक संस्था असलेली युनेस्को इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून अमेरिकेने या संस्थेतून बाहेर पडत असल्याचे गुरुवारी जाहीर केले आहे.

या संस्थेतून अमेरिका ३१ डिसेंबर २०१८ पासून बाहेर पडणार आहे, तोपर्यंत अमेरिका युनेस्कोची पूर्ण सदस्य राहणार आहे. संस्थेमध्ये मूलभूत सुधारणा करण्याची गरज आणि सातत्याने इस्रायलविरोधी भूमिका घेतल्याने अमेरिकेला वाटणारी चिंता या निर्णयातून प्रतिबिंबित होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नॉएर्ट यांनी म्हटले आहे.

युनेस्कोच्या महासंचालक आयरिना बोकोव्हा यांना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला निर्णय कळविला आहे, मात्र बिगरसदस्य म्हणून अमेरिका संस्थेसोबत असल्याचेही महासंचालकांना सूचित करण्यात आले आहे. अमेरिकेचा हा निर्णय दोघांनाही नुकसानीचा ठरणार असल्याचे मत बोकोव्हा यांनी नोंदविले आहे.

बोकोव्हा यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाल संपत आहे. या जागेसाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक राहिला असताना अमेरिकेने युनेस्कोतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काही आठवडय़ांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांच्या न्यू यॉर्कमधील सर्वसाधारण बैठकीवेळीच अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत थांबण्याचा सल्ला इतर सदस्यांनी दिला होता. पॅलेस्टाइनव्याप्त हेब्रॉनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा न देणे, ट्रम्प आणि इस्रायलने घेतलेल्या काही निर्णयांना युनेस्कोने केराची टोपली दाखविल्याने वाद निर्माण झाला होता.

यापूर्वीही सदस्यत्व त्याग

पॅलेस्टाइनला २०११ मध्ये पूर्ण सदस्यत्व दिल्याच्या निषेधार्थ अमेरिकेने युनेस्कोला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवत अर्थसंकल्पातील तरतूदही रद्द केली होती. अमेरिकेचा बाहेर पडण्याच्या निर्णयामागे खर्चात कपात करण्याचे कारण असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधीही रोनाल्ड रेगन राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेने युनेस्कोचे सदस्यपद सोडले होते. यानंतर जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात पुन्हा अमेरिका युनेस्कोची सदस्य झाली होती.

काय करते युनेस्को?

युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. तिची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ मध्ये करण्यात आली. ही संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिसमध्ये असून जगभरात ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत.