डॉ. अ‍ॅन्थनी फौची यांची योजना

न्यू यॉर्क : अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड डिसीसेस’चे संचालक डॉ. अ‍ॅन्थनी फौची हे भविष्यातील काही अतिधोकादायक विषाणूंपासून सुरक्षित राहण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करीत आहेत. सध्याच्या महासाथीला कारणीभूत ठरलेल्या करोना विषाणूचा मुकाबला करणे तुलनेत आपल्याला सुलभ बनले, कारण करोना विषाणू गेली काही वर्षे शास्त्रज्ञांना माहीत होता, त्यावर अभ्यास झाला होता. त्यामुळे या विषाणूची जनुकीय संरचना माहीत होताच त्यावर गरजेनुसार उपचारांची दिशा ठरविणे शक्य झाले. पण यापुढील काळात जर लासा ताप, इबोलाचा सुदानमधील प्रकार किंवा निपाह विषाणू यापासून महासाथ पसरली, तर काय होईल, असा प्रश्न शास्त्रज्ञांना सतावतो आहे, असे न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

अशाच प्रकारची नवी आपत्ती भविष्यात ओढवली तर तिचा मुकाबला कसा करायचा, याचा व्यवस्थापनात्मक आराखडा डॉ. फौची तयार करीत असल्याचे न्यूू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे. या वृत्तानुसार या योजनेवर दरवर्षी काही अब्ज डॉलर खर्च करावे लागतील. ही योजना प्राथमिकरीत्या फलद्रूप होण्यासाठी किमान पाच वर्षे तरी लागतील आणि त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर शास्त्रज्ञांची गरज भासेल, असे फौची यांनी म्हटले आहे. नवी महासाथ आणू शकतील अशा २० वर्गातील विषाणूंपासून मानवाचे संरक्षण करू शकेल, अशी प्रोटोटाइप लस निर्माण करण्याची संकल्पना या योजनेत मांडली आहे. करोना विषाणूवर लस तयार करताना जी साधने उपयोगात आणली गेली, त्यांचाच वापर करून नवी लस तयार केली जाणार आहे. त्यासाठी संशोधक प्रथम त्यांनी निश्चित केलेल्या धोकादायक वर्गवारीतील प्रत्येक विषाणूची रेणूय संरचना जाणून घेतील. त्यानुसार प्रतिपिंडांनी नक्की कुठे कार्यरत व्हावे हे माहीत करून घेतले जाईल. त्याच प्रकारची प्रतिपिंडे शरीरात कशी तयार होतील, याचा अभ्यास केला जाईल.

याबाबत फौची यांनी सांगितले की, ‘‘आम्हाला निधी मिळाला तर.. म्हणजे तो मिळेल असा मला विश्वास आहे, या योजनेचे काम २०२२ पासून सुरू केले जाईल.’’

ही तर काळाची गरज..

राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. फ्रान्सिस कोलिन्स म्हणाले की, फौची यांच्या योजनेसाठी आवश्यक तो निधी मिळण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. ही योजना हाती घेणे ही काळाची गरज बनली आहे. कोविड महासाथीवर यशस्वीरीत्या मात करीत असल्याचा दावा करीत असताना आता आपणास पाऊल मागे घेत आत्मसंतुष्ट बनून चालणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. निधीचा मोठा भाग फौची इन्स्टिटय़ूटकडून मिळण्याची शक्यता आहे.

साथीआधीच अटकाव

प्राण्यापासून माणसात आलेल्या एखाद्या विषाणूची माहिती जर चाचणी यंत्रणांना मिळू शकली, तर त्याविरोधात तात्काळ प्रोटोटाइप लस तयार करून शास्त्रज्ञ संभाव्य महासाथ रोखू शकतात. समजा अशा विषाणूचे अस्तित्व लक्षात येण्याआधीच त्याची साथ पसरली, तर आणखी व्यापक प्रमाणावर अशा प्रोटोटाइप लशीचे वितरण करता येईल. प्रादुर्भावाचे रूपांतर महासाथीत होण्याआधीच विषाणूला अटकाव, असे या योजनेचे स्वरूप असेल, असे स्क्रिप्स रिसर्च इस्टिटय़ूटमधील लस संशोधक डॉ. डेनिस बर्टन यांनी सांगितले. ते तेथील रोगप्रतिकारशक्ती आणि सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.