अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येच्या प्रकरणातील तीन हजार गोपनीय फाईल्स खुल्या करण्यात आल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिल्यानंतर त्या खुल्या केल्या असून संवेदनशील लष्करी व गुप्तचर माहिती मात्र खुली करण्यात आलेली नाही.

नॅशनल अर्काइव्हजने म्हटले आहे,की ट्रम्प यांच्या आदेशानुसार केनेडी यांचा २२ नोव्हेंबर १९६३ रोजी डलास येथे हत्या झाली होती त्याच्या २८९१ फाईल्स खुल्या करण्यात आल्या आहेत.

केनेडी यांच्या हत्येमुळे सगळा देश हादरला होता व ही हत्या कुणी घडवून आणला असावा याबाबत अनेक तर्कवितर्काना तेव्हा उधाण आले होते. दरम्यान सुरक्षा संस्थांच्या विनंतीनुसार काही फाईल्समधील माहिती उघड न करण्याचे ट्रम्प यांनी मान्य केले. संरक्षण व लष्करी हिताच्या दृष्टिकोनातून काही माहिती उघड करणे योग्य नाही, असे ट्रम्प यांनी मान्य केले आहे. या महत्त्वाच्या घटनेची पूर्णस्वरूपी माहिती मिळावी यासाठी सर्वच कागदपत्रे खुली करण्याची मागणी अमेरिकी नागरी तज्ज्ञांनी केली आहे. व्हाइट हाऊस प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी सांगितले, की अध्यक्षांनी याबाबत पारदर्शकता दाखवण्यास सांगितले असून २६ एप्रिल २०१८ पर्यंत यातील संपादित भाग उपलब्ध करून देण्यात येईल. २४ जुलैला नॅशनल अर्काइव्हजने ३८१० नोंदी खुल्या केल्या होत्या.

केनेडी यांच्या खुनापूर्वी ली हार्वी ओसवाल्ड हा मेक्सिको सिटी येथे दिसला होता. गुप्तचर प्रमुख जेम्स जिझस अँगलटन यांनी सीआयएच्या वतीने या खुनाच्या तपासाची सूत्रे घेतली त्याची माहिती आहे.

ब्रिटिश वृत्तपत्राला पूर्वसूचना?

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी याच्या हत्येच्या सुमारे २५ मिनिटांआधी ब्रिटिनच्या ‘केंब्रिज’ वृत्तपत्राला  निनावी दुरध्वनी आला होता. यात अमेरिकेतून एक मोठी बातमी येणार असल्याची माहिती दिली होती. यावेळी वार्ताहाराला एका मोठय़ा बातमीसाठी अमेरिकन दूतावासाला संपर्क करण्यास सांगितले. हा दूरध्वनी कोणी केला याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे वृत्तपत्राने म्हटले.