भारतातून चोरीला गेल्या १२ व्या शतकातील मूर्ती अमेरिकेने परत केल्या आहेत. यामधली एक मूर्ती लिंगोधभव मूर्ती ही १२ व्या शतकातली आहे. या मूर्तीची किंमत २ लाख २५ हजार डॉलर इतकी आहे. ही मूर्ती तामिळनाडूतून चोरीला गेली होती. तर दुसरी मूर्ती मंजुश्री देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती सोनेरी रंगाची असून तिच्या हातात तलावर आहे. मंजुश्री मूर्ती १९८० च्या दशकात बोधगया या ठिकाणाहून चोरीला गेली होती. या मूर्तीची सध्याची किंमत २ लाख ७५ हजार डॉलर इतकी आहे. भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवाच अमेरिकेने आपल्याला परत केला आहे.

अमेरिकेतील दोन संग्रहालयांमध्ये या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. याआधी न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटियन म्युझियम ऑफ आर्टनेही भारतातून चोरीला गेलेल्या मूर्ती भारतीय पुरातत्त्व खात्याला परत दिल्या होत्या. भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांच्या प्रयत्नांमुळे या मूर्ती भारताला परत मिळू शकल्या आहेत.