वॉशिंग्टन : अमेरिकेत करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता ३१ झाली असून संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या हजारावर गेली आहे. देशाच्या तीस  राज्यात विषाणूचा प्रसार झाला असून अनेक राज्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या आता १०३७ झाली असल्याची माहिती जॉन हॉपकिन्स केंद्राने दिली आहे. दक्षिण डाकोटा व कॅलिफोर्नियात प्रत्येकी एक तर वॉशिंग्टन राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता ३१ झाल्याचे दी वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, फ्लोरिडा, ओरेगॉन, मेरीलँड, मॅसॅच्युसेटस, उटाह, न्यूजर्सी व कोलोरॅडोत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

करोनाचा धोका आम्ही गांभीर्याने घेतला असून विशेष दले चांगले काम करीत आहेत असे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.  अमेरिकी कुटुंबांना त्यांचे रक्षण करण्यासाठी लागेल ती सर्व मदत दिली जाईल असे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी म्हटले आहे. सध्या १० लाख चाचण्या केल्या जात असून लवकरच ४० लाख चाचण्यांची व्यवस्था केली जाणार आहे. मॅसॅच्युसेटसमध्ये ५१ रुग्ण सापडले असून तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी ३७ हजार अमेरिकी लोक साध्या फ्लूने मरण पावले होते. त्याचा अर्थ दरवर्षी सरासरी २७ ते ७० हजार लोक फ्लूने मरतात. अमेरिकेत काहीही बंद करण्यात आलेले नसून व्यवहार सुरळित आहेत. अर्थव्यवस्थाही व्यवस्थित आहे.