भारतीय उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांच्यावरील कारवाईप्रकरणी भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची पर्वा न करता अमेरिकेने खोब्रागडे यांच्या अटकेबाबत माफी मागणार नाही की त्यांच्यावरील कारवाई मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. या दोन मागण्या भारताने उच्चरवाने मांडल्या होत्या.
भारतातून आणलेली मोलकरीण संगीता रिचर्ड हिला व्हिसा अर्जात नमूद केल्यापेक्षा कमी पगार दिला आणि खोटी माहिती देऊन दिशाभूल केली, या आरोपावरून खोब्रागडे यांना गेल्या आठवडय़ात न्यूयॉर्कमध्ये अटक झाली होती.
या आरोपांकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहात आहोत. हा निखळ कायदा पाळण्याचा मुद्दा असून आम्ही हे आरोप आणि कारवाई कोणत्याही स्थितीत मागे घेणार नाही, असे परराष्ट्र प्रवक्त्या मॅरी हार्फ यांनी सुनावले.
भारताचा नरम सूर
परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी या प्रकरणात तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली. उभय देशांमधील दृढ होत असलेल्या संबंधांनाही आमच्या लेखी महत्त्व आहे. अमेरिकेनेही ते महत्त्व ओळखून निर्णय घ्यावा, असे आवाहनही खुर्शिद यांनी केले. मॅरी हार्फ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले. उभय देशांत अनेक पातळ्यांवर बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्या प्रत्येकाबद्दल मी बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.