रशियाच्या १० राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करत असल्याची घोषणा अमेरिकेने गुरुवारी केली, तसेच तीसहून अधिक व्यक्ती व महत्त्वाच्या वित्त संस्थांवर निर्बंध लागू केले. गेल्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याबद्दल, तसेच अमेरिकी संघराज्यात्मक यंत्रणांमध्ये हॅकिंग केल्याबद्दल रशियाला जबाबदार मानून अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

रशियाने सात वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये घुसखोरी करून त्यातील क्रिमियाचा भाग आपल्या ताब्यात घेतला, तो अद्यापही आपल्याकडेच राखला आहे. त्याचप्रमाणे युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या व आघाडीच्या सैनिकांविरुद्ध हल्ले चढवण्यासाठी रशिया आर्थिक मदत देत असल्याचाही अमेरिकेचा आरोप आहे. याबद्दल रशियाला दंड आकारणे हाही या निर्बंधांचा उद्देश आहे. अमेरिकेतील निवडणुकांशी आपला संबंध असल्याचा किंवा अफगाणिस्तानात इनाम देत असल्याचा आरोप रशियाने नाकारला आहे. सोलरविंड्स संगणक हल्ल्याशी  काही देणेघेणे नसल्याचेही रशियाने म्हटले आहे.