अमेरिकेतील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूतावासात बदली करण्याच्या अर्जावर तसेच त्यांना कारवाईतून सूट मिळण्यासाठी राजनैतिक दर्जाविषयक कागदपत्रे देण्याबाबतच्या मुद्दय़ावर विचार सुरू आहे, असे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  
   अमेरिकेच्या भारतातील दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन दिले जात असून स्थानिक कायद्याचे कुठेही उल्लंघन करण्यात आलेले नाही असे स्पष्टीकरण अमेरिकेने केले आहे.
परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या बदलीचा अर्ज व कारवाईतून सूट मिळण्यासाठीची कागदपत्रे देण्यावर विचार चालू आहे. संयुक्त राष्ट्रांनी देवयानी खोब्रागडे यांना पूर्ण राजनैतिक दर्जा देण्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला विनंती केली आहे.
संयुक्त राष्ट्रांकडून परराष्ट्र खात्याला २० डिसेंबर रोजी अर्ज मिळाला आहे व अशा प्रकरणात खरेतर त्वरेने निर्णय घेतला जातो पण अमेरिकेने या प्रकरणात निर्णय घेण्यास टाळाटाळ चालवली आहे. या विनंतीची तुलना इतर विनंती अर्जाशी करता येणार नाही असे अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले होते. देवयानी खोब्रागडे यांनी व्हिसा अर्जात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या मोलकरणीला वेतन दिले नाही असा आरोप असून त्यांना न्यूयॉर्क येथे अटक करून हातकडय़ा घालण्यात आल्या व नंतर अंगझडतीही घेण्यात आली होती. त्यांना नंतर अडीच लाख डॉलरच्या जामीनावर सोडण्यात आले असून त्यांचा पासपोर्ट न्यायालयाने ताब्यात घेतला. त्यानंतर भारताने या घटनेचा निषेध करीत भारतातील अमेरिकी दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे राजनैतिक विशेषाधिकार काढून घेतले आहेत.