इस्रायलच्या हेरांनी अमेरिकेला दिलेली गोपनीय माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला पुरवल्याप्रकरणी अमेरिका आणि इस्रायल जाहीररीत्या सारवासारव करत असले तरी दोन्ही देशांच्या हेरखात्यांमध्ये ट्रम्प यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

इस्रायलच्या गुप्तहेरांनी इस्लामिक स्टेट (आयसिस) दहशतवादी हल्ल्यांसाठी लॅपटॉपचा वापर करण्याच्या तयारीत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळवली होती. इस्रायलने ती अमेरिकेला दिली. मात्र ट्रम्प यांनी ही माहिती रशियाच्या राजदूतांच्या भेटीवेळी त्यांना दिली. यावरून इस्रायच्या गुप्तहेर संघटना नाराज झाल्या आहेत. तसेच अमेरिकी हेरही ट्रम्प यांच्या या वागण्याबाबत वैतागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टर यांनी ट्रम्प काही वावगे वागलेले नाहीत, असे म्हटले, तर दोन्ही देशांतील माहितीची देवाणघेवाण पूर्ववत सुरू राहील, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री अविग्दॉर लिबरमान यांनी म्हटले. जाहीररीत्या अशी भूमिका घेतली जात असली तरी आतून सर्व काही आलबेल नाही, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.

इस्रायलच्या हैफा विद्यापीठातील प्राध्यापक उरी बर-जोसेफ यांनी इस्रायलच्या हेरगिरीवर विस्तृत लिखाण केले आहे. त्यांच्या मते ट्रम्प यांच्या वागण्याने इस्रायलच्या गुप्तहेर संघटनांमध्ये नाराजी आणि राग आहे. यापुढे दोन्ही देशांत माहितीची देवाणघेवाण होणार नाही असे नाही; पण अति संवेदनशील माहिती देण्याची वेळ येईल तेव्हा पुन्हा एकदा विचार केला जाईल. जर अध्यक्षांवरच विश्वास ठेवता येत नसेल तर कोणावर ठेवणार, असे बर-जोसेफ म्हणाले.

ट्रम्प यांनी रशियाला ही माहिती देताना वापरलेली भाषा योग्य नाही, असे अमेरिकेच्या सीआयएचे माजी संचालक जॉन ब्रेनन यांनी लास व्हेगासमधील एका कार्यक्रमात म्हटले. इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेचे माजी अध्यक्ष शबताई शावित यांनी म्हटले की, ट्रम्प यांच्या वर्तनाबद्दल हेरगिरीच्या वर्तुळात राग आहे. मोसादचेच माजी अध्यक्ष डॅनी यातोम यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांनी अमेरिकी व इस्रायलच्या सुरक्षेबाबत मोठी तडजोड केली आहे.

फ्लिन यांची चौकशी थांबवली नाही – ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक फ्लिन यांची चौकशी बंद करण्याचे आदेश एफबीआयचे माजी संचालक जेम्स कॉमी यांना दिले नव्हते, असा खुलासा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

ट्रम्प यांच्या निवडणुकीत रशियाच्या गुप्तहेर संघटनांच्या सहभागाबाबात संशय व्यक्त केला जात आहे. त्यादरम्यान फ्लिन यांनी रशियाच्या राजदूतांची भेट घेऊन त्यांना गुप्त माहिती दिल्याचा आरोप होता. त्या संदर्भात फ्लिन यांची एफबीआयकडून चौकशी होत होती. नंतर त्यांनी राजीनामा दिला.

फ्लिन यांची चौकशी थांबवण्याचा आदोश ट्रम्प यांनी कॉमी यांना दिला होता, अशा आषयाचे वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत त्यावर खुलासा केला. पत्रकारांनी त्यांना या संदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी तसे काही केल्याचा इन्कार केला. तसेच अधिक विचारणा केली असता त्या पत्रकारांना डावलून अन्य पत्रकारांच्या प्रश्नांकडे वळले. तसेच कॉमी यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयाचे ट्रम्प यांनी समर्थन केले. कॉमी यांच्या कामाबद्दल अनेक जण नाराज होते. त्यामुळे त्यांना हटवण्यात काही गैर नव्हते असे ट्रम्प म्हणाले.