अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री टोनी ब्लिंकन यांची टीका

अमेरिका व मित्र देशांचे समर्थन असलेली नियमाधिष्ठित व्यवस्था धोक्यात आणण्याची क्षमता चीनमध्ये आहे, त्यामुळे तो देश तसे करू शकतो. त्यांची लष्करी, आर्थिक व राजनैतिक तसेच राजकीय ताकदही तसे करण्याइतकी मोठी आहे, अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री टोनी ब्लिंकन यांनी केली आहे.

ब्लिंकन यांनी मंगळवारी अमेरिकी काँग्रेसच्या बैठकीत सांगितले, की अमेरिका व चीन यांच्यातील संबंध फार गुंतागुंतीचे असून त्यांचे परिणामही व्यापक स्वरूपाचे आहेत. चीनची आर्थिक, राजकीय, राजनैतिक व लष्करी ताकद मोठी असून तो देश अमेरिका व मित्र देशांनी प्रस्थापित केलेली नियमाधिष्ठित व्यवस्था धोक्यात आणू शकतो, किंबहुना त्यांचे तसे प्रयत्नही आहेत. पण अमेरिका व मित्र देश त्यांची सुरक्षा व अनेक वर्षांचे संबंध धोक्यात येऊ देणार नाहीत.

सेनेटच्या विनियोजन समितीसमोर परराष्ट्र खात्यांच्या मागण्यांवर बाजू मांडताना त्यांनी सांगितले, की अमेरिका व चीन यांच्या संबंधांमुळे वाईट परिणाम वाढत आहेत. हे संबंध स्पर्धात्मक आहेत व काही प्रमाणात सहकार्याचेही आहेत. कुठल्याही देशाची ताकद ही त्याच्या इतर देशांशी असलेल्या भागीदाऱ्या व आघाड्यांमध्ये असते. अमेरिकेसाठी तरी हाच मार्ग महत्त्वाचा असून चीनकडे ही ताकद नाही. त्यामुळे अमेरिका नवीन भागीदाऱ्या व आघाड्या तयार करण्याचे प्रयत्न करीत आहे. अमेरिका आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जोमाने पुढे येत आहे कारण अमेरिकेने माघार घेतली तर चीन ती जागा भरून काढण्याची भीती आहे. तसे झाले तर चीन त्यांची व्यवस्था तयार करील. त्यामुळे अमेरिका लष्करी व इतर पातळ्यांवर चीनला रोखण्यासाठी सज्ज आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेने आशिया पॅसिफिक (प्रशांत) क्षेत्राकडे साधने वळवली होती. साठ टक्के नौदलाचा त्यात समावेश होता.

दक्षिण चीन सागरात १३ लाख चौरस मैल क्षेत्रावर चीनचा दावा आहे. चीन तेथे लष्करी तळ तयार करीत असून कृत्रिम बेटेही बांधत आहे. त्या भागावर ब्रुनेई, मलेशिया, फिलिपाइन्स, तैवान व व्हिएतनाम यांनीही हक्क सांगितला आहे.