व्हिसाची मुदत संपल्यानंतरही २१,००० पेक्षा अधिक भारतीय नागरिक सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने बुधवारी या संदर्भातील अहवाल सादर केला. इंडियन एक्स्प्रेसने यांसदर्भात वृत्त दिले आहे.

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या (DHS) माहितीनुसार, इतर देशांच्या तुलनेत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदा पद्धतीने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचे प्रमाण खूप नसले तरी अशा प्रकारणांत भारताचा पहिल्या १० देशांच्या यादीत क्रमांक आहे.

डीएचएसने यासंदर्भात ताजा वार्षिक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या काळात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत हवाई आणि समुद्री प्रवासाद्वारे आलेले ७,०१,९०० परदेशी वास्तव्यास आहेत. यांपैकी २०१७ मध्ये प्रसिद्ध B-1 आणि B-2 व्हिसाच्या मदतीने १०.७ लाखांपेक्षा अधिक भारतीयांनी अमेरिकेला भेट दिली. ज्या लोकांना व्यवसाय, भेट किंवा पर्यटनासाठी अमेरिकेत जायचे असते अशांना हे व्हिसा दिले जातात.

दरम्यान, या १० लाख भारतीयांपैकी १४,२०४ भारतीय लोक बेकायदा अमेरिकेत राहत होते. यांपैकी व्हिसा संपल्यानंतर १,७०८ जणांनी अमेरिका सोडल्याची नोंद आहे. मात्र, १२,४९८ लोकांची अशी नोंद झालेली नाही. त्यामुळे ते अनधिकृत स्थलांतरीत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तर २०१६ मध्ये १० लाख भारतीय B-1 आणि B-2 व्हिसाच्या मदतीने अमेरिकेत दाखल झाले. यांपैकी १७, ७६३ लोक अनधिकृतरित्या अमेरिकेत राहत होते. त्यांपैकी २,०४० लोकांनी काही काळानंतर अमेरिका सोडली. मात्र, १५,७२३ भारतीय अमेरिकेत अनधिकृतरित्या वास्तव्यास आहेत.

२०१७ मध्ये १,२७,३३५ भारतीय विद्यार्थी आणि संशोधन करणारे विद्यार्थी F, J आणि M या व्हिसाच्या मदतीने अमेरिकेत दाखल झाले. यांपैकी ४, ४०० भारतीय मुदत उलटल्यानंतरही अमेरिकेत होते. यांपैकी १,५६७ विद्यार्थ्यांनी नंतर अमेरिका सोडली. मात्र, अद्याप २,८३३ भारतीय अद्यापही अमेरिकेत अनधिकृतरित्या वास्तव्य करीत आहेत.