11 December 2017

News Flash

पुन्हा ९/११ घडविण्याचा दहशतवादय़ांचा कट उधळला

भुयारी रेल्वेमार्गावर हल्ला करण्याचा आयसिसच्या तीन समर्थकांचा कट होता

पीटीआय, वॉशिंग्टन | Updated: October 8, 2017 2:59 AM

संगीत कार्यक्रमांमध्ये नागरिकांवर गोळीबार करण्याचा कट आरोपींनी आखला होता,

अमेरिकी सुरक्षा दलांची कारवाई

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात २०१६मध्ये पुन्हा ९/११ घडवून आणण्याचा दहशतवादी हल्ल्याचा कट फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)आणि न्यूयॉर्क पोलीस दल (एनवायपीडी) यांनी उधळून लावला.

न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘टाइम्स स्केअर’ आणि भुयारी रेल्वेमार्गावर हल्ला करण्याचा आयसिसच्या तीन समर्थकांचा कट होता, अशी माहिती शनिवारी देण्यात आली. २०१६मध्ये रमजानच्या महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेच्या नावाखाली न्यूयॉर्क शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखणाऱ्या तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ताल्हा हरुन (१९) पाकिस्तानस्थित अमेरिकी नागरिक, कॅनडाचा अब्दुल रहमान अल बहनासावे (१९) आणि फिलिपिन्सचा रसल सॅलिक (३७) या तिघांवरील आरोप जाहीर करण्याची परवानगी नुकतीच न्यूयॉर्कच्या सरकारी न्यायालयाकडून देण्यात आली.

हल्ल्यात वापरली जाणारी स्फोटके तयार करण्याचे साहित्य अल बहनासावे याने खरेदी केल्याची माहिती न्याय विभागाकडून देण्यात आली.

हरुन  कटाचा सूत्रधार

हरुन या कटाचा सूत्रधार असून बहनासावे यांच्या मदतीने हल्ला घडवून आणणार होता. हरुन यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण झाले नसून, सॅलिक हा या हल्ल्यासाठी अर्थसाहाय्य करणार होता. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्केअर, भुयारी रेल्वे आणि ठरावीक संगीत कार्यक्रमांमध्ये नागरिकांवर गोळीबार करण्याचा कट आरोपींनी आखला होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

आयसिस समर्थक म्हणून वागणाऱ्या एफबीआयच्या गुप्तहेराने बहनासावे याला हल्ला करण्यास प्रवृत्त केले व हल्ला करण्याआधी त्याला मे २०१६ मध्ये अटक करण्यात आली.

अमेरिकी लोकांना हल्ल्याची गरज

आयसिस समर्थकाचा बनाव करणाऱ्या एफबीआयच्या गुप्तहेराच्या संपर्कात बहनासावे होता. त्याने अमेरिकी लोकांना एका हल्ल्याची गरज असून नवा ९/११ घडवण्याचा मनसुबा असल्याचे सांगितले होते. त्यासाठी तो २२ मे २०१६  दरम्यान कॅनडाहून अमेरिकेला येणार होता.

First Published on October 8, 2017 2:59 am

Web Title: us security forces destroy plan like 911 style terror attack