भारताने अमेरिकेकडे २२ नि:शस्त्र बहुपयोगी प्रिडेटर गार्डियन ड्रोन विमाने मागितली असून ती दिली जाण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरात टेहळणीसाठी या विमानांचा उपयोग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताला अमेरिकेने प्रमुख संरक्षण भागीदाराचा दर्जा दिल्यानंतर अमेरिकेने ड्रोन विमाने देण्यास अनुकूलता दाखवली आहे.

पंतप्रधान मोदी व अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांची जूनमध्ये व्हाइट हाऊस येथे भेट झाली होती व भारतीय नौदलाने या ड्रोन विमानांच्या मागणीसाठी विनंतिपत्रे पाठवली होती. प्रिडेटर गार्डियन ड्रोन प्रकारच्या एकूण २२ विमानांची मागणी भारताने केली आहे त्यांचा उद्देश टेहळणीचा आहे. भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार जाहीर करण्यात आल्यानंतर भारताने प्रथमच अशी विनंती केली होती. अमेरिकी सरकारने याबाबत अजून निर्णय घेतला नसला तरी आंतरसंस्थात्मक पातळीवर भारताच्या विनंतीवर विचार सुरू झाला आहे.

या मोठय़ा लष्करी विक्रीमुळे भारत व अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधांवर शिक्कामोर्तब होणार आहे, त्यामुळे दोन्ही देशांच्या लष्करांना अनुकूल वातावरण तयार होईल.

आशिया-पॅसिफिक भागातील एक प्रमुख देश म्हणून भारताचे स्थान तयार होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते गार्डियन ड्रोनच्या विक्रीमुळे भारताची सागरी सुरक्षा वाढणार असून, हिंदी महासागरात अमेरिकेला विशेष स्वारस्य आहे. वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले, की अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅशटन कार्टर व समपदस्थ मनोहर र्पीकर यांच्यात ड्रोन विमानांबाबत चर्चा झाली होती.

र्पीकर गेल्या आठवडय़ात अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांची पेंटॅगॉनमध्ये कार्टर यांच्याशी चर्चा झाली होती. त्या वेळी भारताची विनंती व्यवस्थेच्या अंतर्गत राहून पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन कार्टर यांनी दिले होते. ओबामा प्रशासनाचा कालावधी संपण्यापूर्वी भारताला ड्रोन विमाने देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जावी यासाठी पेंटॅगॉन व अमेरिकी काँग्रेसचे काही सदस्य प्रयत्नशील आहेत.

 

अमेरिका फिलिपाइन्सला दोन लष्करी विमाने पुरविणार

मनिला : चीनसमवेत सागरी क्षेत्राचा वाद उफाळून आला असल्याने फिलिपाइन्सला सागरी गस्तीचा विस्तार करावयाचा असून त्यासाठी अमेरिकेने फिलिपाइन्सला वापरलेली दोन लष्करी विमाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या डिसेंबर महिन्यांत अमेरिका ३० आसनांची दोन शेर्पा विमाने देणार असल्याचे फिलिपाइन्सच्या तटरक्षक दलाचे प्रवक्ते कमांडर अरमांड बालिलो यांनी सांगितले.या विमानांचा उपयोग आम्हाला फिलिपाइन्सच्या तटवर्ती क्षेत्रावरील गस्ती मोहिमेत होणार असल्याचे बालिलो म्हणाले.

फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डय़ुटर्ट यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने या बाबतची चर्चा फिस्कटली होती, मात्र त्यानंतर सोमवारी अमेरिका विमाने देणार असल्याची घोषणा करण्यात आली.

आशियात मनिलाचे लष्करी सामथ्र्य सर्वात दुबळे आहे. त्यामुळे अमेरिका आणि अन्य मित्र देशांशी संरक्षणविषयक संबंध अधिकाधिक बळकट करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. दोन शेर्पा विमाने उपलब्ध होणार असल्याने तटरक्षक दलास हवाई गस्ती क्षमतेमध्ये वाढ करता येणे शक्य होणार आहे, असे बालिलो यांनी म्हटले आहे. चीनने सागरी क्षेत्रावर केलेल्या दाव्याला कोणताही कायदेशीर आधार नाही, कृत्रिम बेटाची बांधणी करण्याची चीनची कृती बेकायदेशीर आहे, असा निर्वाळा संयुक्त राष्ट्रसंघाने पाठिंबा दिलेल्या लवादाने जुलै महिन्यांत दिला, त्यामुळे फिलिपाइन्सचा विजय झाला होता.