आंतरराष्ट्रीय व्यापार करार वाटाघाटी व करार वेगाने करण्याचे अधिकार अध्यक्ष बराक ओबामा यांना देणारे विधेयक अमेरिकी सिनेटमध्ये मतभेद बाजूला ठेवून मंजूर करण्यात आले. व्यापार वृद्धी प्राधिकरण विधेयकावर रात्री सिनेटमध्ये ४८ रिपब्लिकन व डेमोक्रॅट्सच्या १४ सदस्यांनी बाजूने मतदान केले. आता हे विधेयक प्रतिनिधिगृहात जाणार असून तेथे डेमोक्रॅटकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. सिनेटमध्ये हे विधेयक ६२ विरुद्ध ३७ मतांनी मंजूर झाले असून त्याचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वागत केले आहे.
ओबामा यांनी सांगितले की, आता अमेरिका उच्च दर्जाचे व जास्त चांगल्या दर्जाचे करार अधिक ठोस वाटाघाटींच्या मदतीने करू शकेल. हे करार योग्य प्रकारे केले गेले तर मध्यमवर्गीयांना भरपूर संधी मिळतील. अमेरिकी कर्मचाऱ्यांना समान पातळीवर संधी राहील. आपले उद्योग वाढतील तसेच मेक इन अमेरिका अंतर्गत उत्पादित वस्तू उर्वरित जगात विकल्या जातील. कामगारांच्या हक्कात वाढ, खुल्या व मोफत इंटरनेटला प्राधान्य, अन्याय्य चलन पायंडय़ांना लगाम असे व्यापार वृद्धी प्राधिकरण विधेयकाचे हेतू आहेत.
नॅशनल असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग या संस्थेनेही या विधेयकाचे स्वागत केले आहे. या संस्थेचे अध्यक्ष जे टिमॉन्स यांनी सांगितले की, प्रतिनिधिगृहानेही हे विधेयक मंजूर करावे त्यामुळे जगभरात व्यापार वाढवण्यासाठी अमेरिकी नेतृत्वावर आणखी विश्वास टाकता येईल.
 बाजारपेठा खुल्या होत असताना, रोजगार निर्मिती व्यापार करार आवश्यक आहेत. या विधेयकामुळे अमेरिकेला व्यापक व्यापार कार्यक्रम राबवता येईल, अमेरिकी उद्योग व अमेरिकी शेतकरी यांना संधी मिळेल, त्यामुळे हे विधेयक प्रतिनिधी गृहानेही मंजूर करावे, असे कमिन्स इनकॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम लाइनबर्गर यांनी सांगितले.