विधेयक रद्द करण्याच्या विरोधात मतदान

अमेरिकेत ओबामाकेअर नावाने आळखले गेलेले विधेयक रद्द करण्यासाठी झालेल्या मतदानात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रश्नावरून झालेल्या अटीतटीच्या लढतीत त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या तीन सिनेटरनी विरोधात मतदान केल्याने ट्रम्प यांचे मनसुभे उधळले गेले आहेत.

ट्रम्प यांच्या आधीचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी नागरिकांना सवलतीच्या दरांत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी एक विधेयक संमत केले होते. त्याचा ओबामाकेअर असा उल्लेख केला जातो. मात्र या विधेयकामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे सांगत ट्रम्प यांनी ते रद्द करण्याचे प्रयत्न चालवले होते. शुक्रवारी मध्यरात्री अमेरिकेच्या सिनेटमध्ये या विषयावर मतदान घेण्याच आले. ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष साधारणपणे ओबामाकेअर विधेयक रद्द करण्याच्या तर विरोधी डेमोक्रॅट पक्ष हे विधेयक कायम ठेवण्याच्या बाजूने होता. मात्र ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या जॉन मॅककेन, सुसान कॉलिन्स आणि लिसा मर्कोवस्की या तीन सिनेटरनी ओबामाकेअर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान करत बंडखोरी केली. हे तीन सिनेटर विरोधी डेमोक्रॅट पक्षाला मिळाल्याने ट्रम्प प्रशासन हे मतदान ४९ विरुद्ध ५१ मतांनी हरले.

ट्रम्प यांनी हा विषय वैयक्तिक प्रतिष्ठेचा केला होता. अध्यक्षीय निवडणुकीतही त्यांनी निवडून आल्यास ओबामाकेअर विधेयक रद्द करण्याचे आश्वासन अमेरिकी मतदारांना दिले होते. निवडून आल्यानंतरही त्यांचे यासाठी अनेक प्रयत्न केले होते.