देवयानी खोब्रागडे अटकप्रकरणी माफी ही केवळ औपचारिकता असून, अमेरिकेने आपली चूकही कबूल केलीच पाहिजे, अशी ठाम मागणी संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी गुरुवारी केली. अन्य देशांनी या प्रकरणापासून धडा घेऊन आपला आवाज उठविला पाहिजे, असेही ते म्हणाले.
खटला मागे घ्या
दरम्यान, अमेरिकेने भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांच्यावरील खटला मागे घेतला पाहिजे, अशी मागणी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी अमेरिकेकडे केली. याप्रकरणात नेमके काय घडले, याची माहिती आपण अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून मागविली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमधील पोलीसांनी अटक केल्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले आहेत. भारतानेही अमेरिकस जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही सर्व पक्षांच्या सदस्यांनी याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबंधांना अनेक पैलू असून, ते एकदम ताणता येणार नाहीत. या विषयाकडे संवेदनशीलपणेच बघितले पाहिजे, असे खुर्शीद यांनी सांगितले.