अमेरिकेत तब्बल १८ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा आर्थिक चक्रे अंशत: थंडावली, देशाच्या अर्थसंकल्पावर, रिपब्लिकन व डेमोक्रॅट या दोन पक्षात अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या ‘ओबामा केअर’ या आरोग्य सुधारणा योजनेसाठी तरतुदी करण्याविषयी मतैक्य न झाल्याने आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर ही आफत आली. कुठल्याही पक्षाने माघार घेण्यास नकार दिल्याने अखेरच्या क्षणी तडजोडीचे मार्ग संपल्याने अखेर अमेरिकेचे राज्यशकट हाकणाऱ्या व्हाइट हाऊसने संघराज्य सरकारच्या काही संस्था बंद करण्याची घोषणा केली. १९९५ नंतर प्रथमच अमेरिकेची आर्थिक चक्रे मंदावली असून त्याचा फटका म्हणून किमान आठ लाख लोकांना सक्तीच्या बिनपगारी रजेवर पाठवले जाणार आहे.
 संघराज्य संस्थांनी आमच्या योजनेनुसार शटडाऊन कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. अल्प मुदतीचा दिलासा देणारा ठराव मंजूर करून काँग्रेसने तातडीने कृती करावी, त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्यास उसंत मिळेल. त्याचबरोबर महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा-सुविधा पुन्हा पूर्वपदावर आणता येतील, असे व्यवस्थापन कार्यालय व अर्थसंकल्प संचालक श्रीमती सिलविया मॅथ्यूज बरवेल यांनी सांगितले.
भारताच्या निर्यातीवर परिणाम
या शटडाऊनमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसेल, असे अ‍ॅसोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांनी सांगितले. भारतीय निर्यातदारांसाठी निश्चितच अमेरिकेतील शटडाऊन वाईट परिणाम करणारे आहे. मालवाहतूक परवान्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. भारताची निर्यात वाढत असताना शटडाऊन झाल्याने त्याचा परिणाम वाईटच आहे.

नेमके काय होणार?
* शटडाऊन म्हणजे अमेरिकेत राष्ट्रीय उद्याने, नेहमीच्या अन्न तपासणी मोहिमा, सरकारी कार्यालयीतील काही कामे बंद.
* संघराज्य कर्मचाऱ्यांना सक्तीच्या बिनपगारी रजेवर जावे लागेल. जीवनावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा केला जाईल.
* शटडाऊन काळातील वेतन कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.मागेही अशा प्रकारांमुळे अर्थव्यवस्था विस्कळित होण्याचे प्रकार घडले आहेत. या वेळीही अर्थव्यवस्थेला थोडी उभारी येण्याची चिन्हे असतानाच तिची चक्रे मंदावणार आहेत.

शटडाऊन घोषित केले
असले तरी अमेरिकेला असलेले सुरक्षा धोके कमी झालेले नाहीत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही आपत्कालीन स्थितीस तोंड देण्याला सज्ज असले पाहिजे. काँग्रेसच्या संमतीनंतर कायद्यावर स्वाक्षरी केली असून तुम्हाला तुमचे पगार वेळेवर मिळतील, तुम्ही व तुमच्या कुटुंबीयांवर परिणाम होऊ दिला जाणार नाही.  
– बराक ओबामा