वीस वर्षांच्या शीख अमेरिकी युवकाने अमेरिकेत कायदेशीर लढाई जिंकून फेटा व दाढी राखत लष्करात प्रशिक्षण घेण्यची परवानगी मिळविली आहे.
अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश अ‍ॅमी बर्मन जॅकसन यांनी शुक्रवारी इकनूर सिंग या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला. सिंग हा लाँग आयलंड येथील हॉफस्त्रा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याने अमेरिकेच्या राखीव लष्करी अधिकारी प्रशिक्षणासाठी अर्ज केला होता. त्याने दाढी राखली होती तसेच पारंपरिक फेटाही कायम ठेवला होता. त्यामुळे त्याला या कार्यक्रमासाठी प्रवेश नाकारण्यात आला. तो न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे जन्मलेला आहे. आपल्या धार्मिक श्रद्धांना आक्षेप घेतल्याने धार्मिक स्वातंत्र्यावर र्निबध येत असल्याचा आरोप सिंग याने केला आहे. त्याने हॉफस्ट्रा विद्यापीठाचे लेफ्टनंट कर्नल डॅनियल सेडरमन व इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या विरोधात दाद मागितली होती. न्यायाधीशांनी ४९ पानांच्या निकालपत्रात म्हटले आहे, की लष्कराने गणवेशात अनेक ठिकाणी अपवादात्मक बदल केले आहेत. सिंग याने कुठल्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नसून तो दाढी राखून फेटा परिधान करीत असला, तरी या लष्करी कार्यक्रमात प्रवेश देण्यात यावा. सिंग याने या निकालाचे स्वागत केले असून, अमेरिकेत धार्मिक स्वातंत्र्याचा आदर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सिंग याला इंग्रजी, पंजाबी, हिंदूी व उर्दू अशा चार भाषा येत असून त्याला लष्करात गुप्तचर अधिकारी बनायचे आहे. अर्थशास्त्र व उद्योग विश्लेषण या विषयातही त्याला रुची आहे.