अमेरिकेतील फ्लोरिडा येथे स्टेडियमजवळ गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली. यात सहा जण जखमी झाले असून गँगवॉरमधून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे.

फ्लोरिडातील स्टेडियममध्ये रविवारी सामना होता. हा सामना सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदरच स्टेडियमजवळ गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनीही स्टेडियम परिसरात बंदोबस्त वाढवत हल्लेखोरांचा शोध घ्यायला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर कारमधून आले होते. कारमध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या हल्लेखोराने गोळीबार केला आणि ते पसार झाले. गोळीबारात २० ते ७० या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. पाच पुरुष आणि एक महिला यात जखमी झाली आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांचा जबाब घेतला जाणार आहे.या गोळीबाराचा सामन्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.

गँगवॉरमधून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस दलातील सूत्रांनी व्यक्त केला. तर फ्लोरिडा पोलिसांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही या घटनेचा सखोल तपास करत आहोत. हल्ल्याचा नेमका हेतू काय होता, गोळीबार करणारे कोण होते, याचा तपशील तपासानंतरच उघड केला जाईल. जखमींबाबतही पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.