अफगाणिस्तानातील राजकीय संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका मध्यस्थ होण्यास तयार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जॉन केरी यांनी तसे संकेत दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडीवरून सध्या जो वाद सुरू आहे. तो देशाच्या भवितव्यासाठी घातक असल्याचा इशाराही त्यांनी शुक्रवारी दिला.
प्रतिस्पर्धी उमेदवार अश्रफ गनी आणि अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांची केरी यांनी स्वतंत्ररीत्या भेट घेतली. या वेळी त्यांनी गेल्या सोमवारी हाती आलेल्या निकालामध्ये गनी यांनी आघाडी घेतली असून ती ‘प्राथमिक’ असल्याचे म्हटले होते. विजय कोणाचा झाला आहे, हे या क्षणी ठामपणे सांगता येणार नाही. कारण हे निकाल निर्णायक नाहीत, असे ते म्हणाले होते. काबूल येथील वकिलातीत अत्यंत कडेकोट बंदोबस्तात केरी यांनी बैठका घेतल्या. आम्हाला एकजूट असलेला, स्थिर, लोकशाहीप्रधान अफगाणिस्तान हवाय. कायदेशीर मार्गाने ज्याला या देशाचा अध्यक्ष बनायचा आहे, तो जनतेने निवडलेला असावा, असे मत केरी यांनी व्यक्त केले. आगामी सरकार हे एक असावे. ते लोकांना एकत्र आणेल आणि राष्ट्राचे भवितव्य सुरक्षित करेल, असे ते म्हणाले. अब्दुल्लाह हे सत्तेचे दावेदार ठरू शकणार नाहीत, अशी घोषणा सोमवारी केली होती.