भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत असून त्याला अमेरिकेचा नेहमीच पाठिंबा राहील, मात्र अमेरिका त्या प्रश्नांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, असे ओबामा प्रशासनातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे, मात्र हा त्या दोन देशांमधील प्रश्न असल्याने तो त्यांनीच सोडवावा. अमेरिका त्यामध्ये आवश्यक तेव्हा आणि आवश्यक तितके सहकार्य करील, असे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील कारभार पाहणारे अमेरिकेचे प्रतिनिधी डॅनिअल फेल्डमन यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेने स्वत:हून या प्रश्नात गुंतावे इतके विशेष त्यामध्ये काही नाही. वाणिज्य मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत व्यापारविषयक जे निर्णय घेण्यात आले त्याबाबतची माहिती मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध दिवसेंदिवस प्रगती करतील, अशी आम्हाला आशा आहे, असेही फेल्डमन म्हणाले.