अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानला दणका दिला. अमेरिकेने पाकिस्तानची २५५ दशलक्ष डॉलरची मदत रोखली असून दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या सहकार्यावरच आर्थिक मदतीचे भवितव्य अवलंबून आहे, असे अमेरिकेने पाकला ठणकावले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षात केलेल्या पहिल्याच ट्विटमध्ये पाकवर आगपाखड केली होती. अमेरिकेने दिलेल्या अब्जावधी डॉलरच्या मदतीच्या मोबदल्यात पाकिस्तानने दहशतवाद्यांना आसरा देऊन अमेरिकेची फसवणूक केली. अमेरिकी नेत्यांनी आजवर आपली गणना मुर्खात करुन घेतली, मात्र आता पुरे, अशा शब्दात ट्रम्प यांनी पाकला सुनावले होते. गेल्या १५ वर्षात अमेरिकेने पाकला ३३ अब्ज डॉलरची मदत केली, मात्र त्या बदल्यात पाकने आम्हाला केवळ भूलथापा दिल्या, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. ट्रम्प यांनी पाकला सुनावल्याने अमेरिकेकडून पाकला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवली जाईल, असे संकेत मिळाले होते.

अपेक्षेप्रमाणे मंगळवारी ट्रम्प प्रशासनाने पाकला आणखी एक दणका दिला. पाकला देण्यात येणारी २५५ दशलक्ष डॉलरची मदत रोखण्यात आली. व्हाईट हाऊसने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राष्ट्राध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केली आहे, पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई करावी, यावरच संरक्षणविषयक आणि आर्थिक मदतीचे भवितव्य अवलंबून आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध अत्यंत तणावपूर्ण असून पाकने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याने अमेरिका पाकवर नाराज आहे. जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईतील २००८ मधील हल्ल्यांचा सूत्रधार हाफिद सईद याला पाकने नजरकैदेतून मुक्त केले होते. यानंतर सईदने राजकीय पक्ष सुरु करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा दणका दिल्याने भारतासाठी सकारात्मक मानले जात आहे.