रक्तामध्ये गाठी होण्याचे प्रकार

वॉशिंग्टन : करोनाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेमध्ये वापरण्यात येणाऱ्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या कोविड-१९ लशीचा वापर काही काळासाठी थांबविण्याची सूचना अमेरिकेने केली आहे. ही लस घेतल्यानंतर सहा जणांच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिकेच्या विकार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एका संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे की, ही लस घेतल्यानंतर सहा महिलांच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्याचे आढळले. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या लशीची केवळ एकच मात्रा घ्यावी लागते, तर अन्य लशींच्या दोन मात्रा घ्याव्या लागतात.

रक्ताच्या गाठी झाल्याची तक्रार करणाऱ्या सहाही महिला असून त्या १८ ते ४८ वयोगटांतील आहेत. लशीची मात्रा घेतल्यानंतर १३ दिवसांनी लक्षणे आढळून आली. डॉक्टरांनी रक्ताच्या गाठींवर उपचार केले, मात्र आरोग्य नियामकांनी हे प्रकरण गंभीर असू शकते असे नमूद करून वेगळ्या उपचारांची शिफारस केली. दरम्यान, लशीचा आणि रक्तामध्ये होणाऱ्या गाठींचा थेट संबंध नाही, याबाबत प्राधिकरणांशी आम्ही संपर्क साधला आहे, असे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे.

जिनोव्हाकडून लसचाचणीची तयारी 

नवी दिल्ली : पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स लि. कंपनीने तयार केलेल्या एचजीसीओ १९ लशीच्या टप्पा १ व २ मधील चाचण्यांसाठी व्यक्तींची (स्वयंसेवक) नोंदणी सुरू करण्यात आली आहे. भारताच्या जैवतंत्रज्ञान विभागाने या लशीत बीज भांडवल गुंतवले आहे.