काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आर्थिक मदत न देण्याच्या निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने पाकला आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकन लोकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल, असे हीथर नोर्ट यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना वेसण घालण्याचा इशारा देऊन चार महिने उलटले आहेत. याशिवाय, अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय बैठकाही झाल्या. तरीदेखील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसारख्या संघटनांकडून अफगाणिस्तान परिसरात अशांतता पसरवली जात आहे. पाकिस्तानकडून मिळणारे अभय यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे या संघटना अमेरिकन लोक आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना लक्ष्य करत आहेत. दहशतवादामुळे पाकिस्तानचेही मोठे नुकसान होत आहे. येथील सुरक्षा यंत्रणा अल-कायदा, आयसिस आणि तालिबानी यांसारख्या संघटनांशी प्रभावीपणे लढाही देत आहेत. मात्र, आता अमेरिका आणि पाकिस्तानने एकत्र येत याविरुद्ध लढा देण्याची गरज असल्याचे हीथर नोर्ट यांनी सांगितले.

गेल्या १५ वर्षांमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलर्सचं सहाय्य केलं असून तो मुर्खपणा होता असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अफगाणिस्तानमध्ये आम्ही शोधत असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देत होता असा आरोपही ट्रम्प यांनी केला होता. आता बास्स, या शब्दांमध्ये ट्रम्प यांनी नववर्षांचं स्वागत पाकिस्तानला झिडकारत केलं होतं.