अमेरिकेत एका किशोरवयीन मुलावर इसीस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेने सीरिया व इराक या दोन्ही देशातील अनेक भागात कब्जा मिळवला आहे. हमझा अहमद (१९) असे या पकडलेल्या मुलाचे नाव असून मिनियापोलिस येथून त्याला ताब्यात घेतले आहे.
तेथून एकूण ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची संख्या चार झाली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायात सामील होण्यासाठी तो सीरियाला जायला निघाला होता असे अमेरिकी अभियोक्ता एम ल्युगर यांनी सांगितले.
त्याला दोषी ठरवण्यात आले असून त्याच्या व इतर तिघांच्या विरोधातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली.
 मिनियापोलिस येथून ते बसने न्यूयॉर्क शहरातील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते. त्यांनी ८ नोव्हेंबर २०१४ रोजी इस्तंबूल येथे जाण्यासाठी अहमद याने विमानाची तिकिटे काढली होती. इतर तिघांनाही विमानात बसताना पकडण्यात आले. अहमद हा विमानात बसला होता पण अमेरिकी सीमाशुल्क व सीमा संरक्षण विभागाने त्याला विमानातून खाली उतरवले व त्याला अटक केली.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार एफबीआयने केलेल्या तपासात त्याने अनेक विसंगत उत्तरे दिली असून इतरांविषयी आपल्याला काही माहिती नाही असे सांगितले. अहमद हा एफबीआयशी अनेकदा खोटे बोलला असे अभियोक्तयांनी म्हटले आहे.