पाकिस्तानला एफ १६ विमाने देण्यास भारताचाच नव्हे तर अमेरिकी काँग्रेसच्या काही सदस्यांचा विरोध असतानाही अखेर आठ एफ १६ विमाने त्या देशाला देण्याची अधिसूचना अमेरिकी संघराज्य प्रशासनाने काढली आहे.

दक्षिण आशियात पाकिस्तान हा सामरिक भागीदार आहे त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही विमाने देण्यात येत आहेत, असे संघराज्य अधिसूचनेत म्हटले आहे. संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने ११ फेब्रुवारी रोजी प्रतिनिधिगृहाचे सभापती पॉल रायन यांना पाठवलेले पत्र या अधिसूचनेत जोडले आहे. एफ १६ विमानांची एकूण किंमत ७०० दशलक्ष डॉलर्स असून पाकिस्तान सरकारने या विमानांची मागणी केली होती. भारताने एफ १६ विमाने पाकिस्तानला विकत देण्यास विरोध केला होता. एफ १६ विमाने पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी देण्यात येत असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी सिनेटमधील त्यांच्या सहकाऱ्यांना एफ १६ विमाने पाकिस्तानला देण्यास विरोध करण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे संरक्षण सल्लागार सरताज अझीज यांनी डिफेन्स रायटर्स ग्रुपला या आठवडय़ात सांगितले, की पाकिस्तानने एकूण १८ एफ १६ विमाने मागितली होती. पण आर्थिक कारणांमुळे केवळ आठच विमाने खरेदी करता आली. पहिल्या पाच वर्षांत एफ १६ विमानांच्या खरेदीत अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदतही करणार आहे. दहशतवादविरोधी मोहिमेला असलेले महत्त्व लक्षात घेऊन अमेरिकेने ही विमाने देऊ केली आहेत. ही विमाने केवळ आदिवासी भागात वापरणार का या प्रश्नावर त्यांनी दुसरीकडे ही विमाने वापरली जाऊ शकता असे सूचित केले आहे. गेली दोन-तीन वर्षे ही विमाने वापरली जात आहेत आता आम्हाला आणखी विमाने दहशतवादविरोधी लढाईत हवी होती, असे अझीज यांनी सांगितले. अमेरिकेने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, की पाकिस्तानला ही विमाने दिल्याने त्यांच्या संरक्षण व दहशतवादाविरोधात लढण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. पाकिस्तानी हवाई दलात एफ १६ विमानांचे प्रमाण वाढत आहे, त्यातून महिन्याला दिले जाणारे प्रशिक्षण वाढवता येणार आहे व नवीन वैमानिकांना ही विमाने चालवण्याची क्षमता प्राप्त होणार आहेत.

सिनेटर रँड पॉल यांच्यासह अनेकांचा विरोध

अमेरिकेचे सिनेटर रँड पॉल यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानला एफ १६ विमाने मिळू नयेत, अशी आपली भूमिका असून इतर सिनेटर्सनी त्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे. पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी साटेलोटे असताना त्यांना ही विमाने व इतर महत्त्वाची संरक्षण सामग्री देणे चुकीचे आहे. त्यातही पाकिस्तानला अमेरिकी करदात्यांच्या पैशातून संरक्षण सामग्री खरेदीत अनुदान दिले आहे. पॉल यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानला ही विमाने विकण्यास आमचा विरोध आहे, सिनेटमध्ये ठराव क्रमांक ३१ मांडून आम्ही विमाने व इतर सामग्री पाकिस्तानला देण्यास विरोध करणार असून तो ठराव मतदानाला टाकण्याचा आग्रह धरणार आहोत, त्यामुळे जर हा ठराव मंजूर झाला तर पाकिस्तानला एफ १६ विमाने मिळणार नाहीत. अफगाण तालिबान व हक्कानी नेटवर्कशी एकनिष्ठ असलेल्या पाकिस्तानला ही विमाने देणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सिनेट परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष बॉब कॉर्कर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्यावर याच प्रकरणात टीका केली होती. अमेरिकी करदात्यांच्या पैशातून पाकिस्तानला स्वस्त दरात एफ १६ विमाने देणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. लष्करी सेवा समितीचे अध्यक्ष जॉन मॅक्केन यांनी या विमानांची पाकिस्तानला विक्री करण्यावर चिंता व्यक्त केली होती. आशिया-पॅसिफक परराष्ट्र उपसमितीचे अध्यक्ष मॅट सामन यांनीही पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेत संदिग्धता असल्याचे म्हटले होते. अमेरिकी प्रतिनिधिगृहाचे सदस्य टेड पो व तुलसी गॅबार्ड यांनीही केरी यांना १६ फेब्रुवारीला पत्र पाठवून अमेरिकेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानातील मानवी हक्कांची स्थिती दयनीय असल्याचा आरोप सिनेटर पॉल यांनी केला आहे.