सौदी अरेबियाचे राजपूत्र महंमद बिन सलमान हे अमेरिका दौऱ्यावर असतानाच अमेरिकेने सौदीला १ अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रे विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ६,७०० अँटी टँक मिसाईल्सचा समावेश आहे.

सौदी अरेबियाचे राजपुत्र महमंद बिन सलमान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने सौदीला शस्त्रास्त्रे विकण्याचा प्रस्ताव मांडला. १ अब्ज डॉलर्सच्या या करारात अँटी टँक मिसाईल्ससह अमेरिकन टँक, हेलिकॉप्टर आणि अन्य शस्त्रास्त्रांच्या देखभालीसाठी लागणारे साहित्य आणि स्पेअर पार्ट्सचा समावेश आहे.

सौदीचे राजपुत्र महमंद बिन सलमान यांनी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ते तीन आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. येमेनमधील संघर्षात सौदीच्या नेतृत्वाखालील सैन्याच्या कारवाईत सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू होत असल्याने अमेरिकेने यावर चिंता व्यक्त केली. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस म्हणाले, येमेनमधील संघर्षात सौदी अरेबिया हा देखील एक पक्ष आहे. त्यामुळे येमेनमध्ये तोडगा काढण्यासाठी सौदी अरेबियाची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील सिनेटमध्येही येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील सैन्याला पाठिंबा देण्यावरुन वादळी चर्चा झाली होती.