वॉशिंग्टन: अमेरिका कोविड प्रतिबंधासाठी आणखी २ कोटी लस मात्रा जगाला देणार असून एकूण आठ कोटी मात्रा दिल्या जाणार आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.

त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पुढील सहा आठवडय़ांत आठ कोटी मात्रा परदेशात पाठवण्यात येणार असून जूनअखेरीपर्यंत अमेरिकेने तयार केलेल्या १३ टक्के मात्रा परदेशांना देण्यात येणार आहेत. एखाद्या देशाने जगाला एवढय़ा मात्रा पुरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया व चीन यांनीही एवढय़ा मात्रा दिलेल्या नसून त्यांनी केवळ १.५कोटी मात्रा दिल्या आहेत. लशींच्या संदर्भात चीन व रशिया यांचा बराच गाजावाजा होता पण तरी अमेरिकेनेच जास्त लशी पुरवल्या असून नवप्रवर्तनाचे दर्शन घडवित करोना काळात मदत केली आहे. करोना विरोधातील लढाईत अमेरिका हेच जगाचे शस्त्रागार ठरले आहे. जगात सगळीकडे करोनाची साथ संपावी यासाठी आम्ही लशी देत आहोत. इतर देशांकडून काही फायदा मिळावा अशी आमची कुठलीच इच्छा नाही असे सांगून बायडेन म्हणाले की, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या ६ कोटी व परवाना मिळालेल्या इतर २ कोटी लशी आम्ही जगाला देणार आहोत. मार्चमध्ये आम्ही चाळीस लाख अ‍ॅस्ट्राझेनेका लशी कॅनडा व मेक्सिकोला दिल्या होत्या. एप्रिलअखेरीस  आम्ही  ६ कोटी लशी परदेशांना देण्याचे ठरवले आहे.  अ‍ॅस्ट्राझेनेका लशीला अजून अमेरिकेत वापरासाठी मान्यता मिळालेली नाही. अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन लवकरच या लशीला मान्यता देईल.