एच १ बी पारपत्रधारक व्यक्तीच्या जोडीदाराला यापुढे अमेरिकेत नोकरी करता येणार नाही, असा नवीन नियम ट्रम्प प्रशासन करणार आहे. ओबामा यांच्या काळात दोघांनाही नोकरीची परवानगी होती, पण आता एच १ बी पारपत्र असलेल्या व्यक्तीच्या जोडीदाराला काम करता येणार नाही. त्यामुळे हजारो भारतीय व्यक्ती व त्यांच्या कुटुंबांना फटका बसणार आहे.

२०१५ पासून एच १ बी पारपत्र दिल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या जोडीदारालाही नोकरीची संधी मिळत असे. एच १ बी पारपत्रधारकांना ग्रीनकार्ड मिळण्याची सोय असून, जोडीदाराला एच ४ पारपत्र अंतर्गत काम करण्याची संधी मिळत होती, हा नियम ओबामा प्रशासनाच्या वेळी लागू होता. २०१६ मध्ये एच ४ पारपत्र असलेल्या ४१ हजार जणांना कामाची किंवा नोकरीची संधी मिळाली होती. या वेळी जूनमध्ये हे प्रमाण ३६ हजार आहे. एच १ बी पारपत्र कार्यक्रमात परदेशातील कुशल मनुष्यबळास प्राधान्य दिले जाते.

अंतर्गत सुरक्षा मंत्रालय आता अस्थलांतरित एच १ बी पारपत्रधारक व्यक्तीच्या जोडीदारांना नोकरी किंवा काम करता येणार नाही, अशी तरतूद करणार आहे.

ट्रम्प यांच्या बाय अमेरिकन व हायर अमेरिकन या धोरणानुसार हा नवीन नियम करण्यात आला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार यात एच १ बी पारपत्रधारकांना रोजगाराचे इतर मार्ग बंद होणार नाहीत, पण त्यामुळे कुशल कामगार त्यांच्या जोडीदारास नोकरी किंवा रोजगार न मिळाल्यास अमेरिकेत राहण्यास तयार होणार नाहीत. एच १ बी पारपत्र कार्यक्रमात अनेक बदल केले जाणार असून ते भारतीय कुशल कामगारांना हानिकारक असणार आहेत.