अमेरिकेने सहा मुस्लिमबहूल राष्ट्रांमधील निर्वासितांसाठी आता नवीन व्हिसा धोरण जाहीर केले आहे. अमेरिकेशी जवळचे कौटुंबिक आणि व्यापारी संबंध असल्यावरच अमेरिकेचा व्हिसा मिळेल असे ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ मुस्लिम राष्ट्रांवर घातलेली बंदी अंशत: लागू करण्याची परवानगी दिली असतानाच प्रशासनाने नवीन धोरण जाहीर केले आहे.

बुधवारी ट्रम्प प्रशासनाने व्हिसासाठीची नवी नियमावली दुतावासांना पाठवली आहे. यानुसार सहा प्रतिबंधित देशांमधील नागरिकांना व्हिसासाठी अर्ज करताना अमेरिकेत राहणारे पालक, पती, मुलगा, मोठी मुलगी किंवा मुलगा, जावई, सून किंवा भाऊ-बहिणींसोबतचे नाते सिद्ध करावे लागणार आहे. आजी- आजोबा, नातू, काकू, काका, पुतणी, भाचा, होणारी पत्नी हे जवळच्या नातेवाईकांमध्ये येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कौटुंबिक नात्यासोबतच अमेरिकेसोबत व्यापारी संबंध असलेल्यांना व्हिसा मिळू शकणार आहे.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ देशांची नावे प्रतिबंध यादीत समाविष्ट केली होती. यामध्ये सीरिया, लिबिया, इराण, सोमालिया, सुदान आणि येमेनच्या नागिरकांचा समावेश होतो. या देशांमधील निर्वासितांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला होता. या निर्णयावरुन ट्रम्प प्रशासनावर टीका होत होती. अमेरिकेतील विविध न्यायालयांनी या आदेशाविरोधात निकाल दिला होता. शेवटी हे प्रकरण अमेरिकेतील सुप्रीम कोर्टात गेले होते. गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने या आदेशाची अंशत: अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली होती.