आपल्या सामायिक हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि संरक्षणविषयक क्षमतांचे अधिक आदानप्रदान करण्याची मुभा देण्यासाठी भारत- प्रशांत  (इंडो-पॅसिफिक) क्षेत्रासाठी एका नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया यांनी केली आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत असतानाच, ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या मिळवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

तिन्ही देशांच्या आद्याक्षरांचा समावेश असलेली आणि ‘महत्त्वाची’ असे वर्णन करण्यात आलेल्या ‘एयूकेयूएस’ या नव्या आघाडीचे उद्घाटन दूरचित्रवाणीवरील संयुक्त भाषणासह आभासी पद्धतीने बुधवारी करण्यात आले. या आघाडीअंतर्गत, संयुक्त क्षमतांचा विकास व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, तसेच सुरक्षा आणि संरक्षणसंबंधित विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक तळ आणि पुरवठा साखळ्या यांचे अधिक सखोल एकीकरण करण्याचे तिन्ही देशांनी मान्य केले आहे.

‘ऑकस’चा पहिला मोठा उपक्रम म्हणून, ऑस्ट्रेलिया अमेरिका व ब्रिटनच्या मदतीने अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्यांचा एक ताफा बांधणार आहे. भारत- पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही क्षमतावाढ करण्यात येत आहे.

‘ब्रिटन, ऑस्टेरलिया व अमेरिका हे नैसर्गिक सहकारी आहेत. आम्ही भौगौलिकदृष्ट्या विभक्त असलो, तरी आमचे हित व मूल्ये सामायिक आहेत’, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संयुक्त निवेदन जारी होण्यापूर्वी डाउनिंग स्ट्रीट येथून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सोबतीने केलेल्या आभासी भाषणात सांगितले.