हिंदू व बौद्धधर्मीयांसाठी पवित्र मानले गेलेले ‘स्वस्तिक’ चिन्ह नाझींच्या चिन्हाशी मिळतेजुळते असल्याने ज्यूधर्मीय विद्यार्थ्यांची संवेदनशीलता दुखावू शकते असे वाटत असल्यामुळे या चिन्हावर बंदी घालण्याचा प्रतिष्ठित असे जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ विचार करत आहे.
गेल्या महिन्यात भारताच्या सहलीवरून परत आलेल्या एका अज्ञात ज्यू विद्यार्थ्यांने स्वस्तिकची प्रतिमा सोबत आणली. त्याने ज्यू समुदायाच्या निवासी सभागृहातील माहितीफलकावर लावली. या समुदायाच्या एका सदस्याने हे चिन्ह पाहिल्यानंतर ही कुठल्या तरी प्रकारची धमकी असल्याचे समजून पोलिसांना याबाबत माहिती दिली. कुठलाही धोका नसल्याची तक्रारकर्त्यां विद्यार्थ्यांची खात्री झाल्यानंतर गैरसमज दूर झाला व पोलिसांनी तपास थांबवला.
या प्रकारानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले. ज्या विद्यार्थ्यांने हे चिन्ह लावले, त्याला विद्यापीठातून कायमचे काढून टाकले जाणार असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. विद्यापीठाच्या परिसरात नाझी विचारसरणीचे चिन्ह लावण्यामागील हेतूचा या कृतीला ‘द्वेषपूर्ण गुन्हा’ ठरवण्याच्या निश्चयावर काही परिणाम होणार नाही, असे विद्यापीठाचे अध्यक्ष स्टीव्हन नॅप म्हणाले.