केवळ स्थानिक उपकरणांचाच वापर असलेल्या भारताच्या सौर ऊर्जा मोहिमेविरोधात अमेरिकेने भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे दाद मागितली आहे. तर याला भारत योग्य तो प्रतिसाद देईल, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताच्या सौर ऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ देशी उपकरणांचाच वापर करण्याच्या भूमिकेविरुद्ध अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेच्या वाद सल्लागार समितीची मदत घेण्याचे ठरविले आहे, असे अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी मायकेल फ्रॉमन यांनी सांगितले.
अमेरिकेतील उपकरणांऐवजी भारतीय उपकरणांचा वापर करण्याचा निर्णय अमेरिकेच्या निर्यातीशी सापत्नभाव दर्शविणारा आहे. भारताचा हा अयोग्य निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या विरोधातील आहे. त्यामुळे आम्ही आता अमेरिकेतील कामगार आणि व्यापार यांच्या हक्कासाठी उभे ठाकलो आहोत, असेही फ्रॉमन यांनी वार्ताहरांना सांगितले.
भारताचा सौर ऊर्जा कार्यक्रम जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या अधीन राहून आखण्यात येत असल्याने जिनेव्हास्थित संघटनेतही भारत आपल्या भूमिकेचे जोरदार समर्थन करील, असे स्पष्ट करण्यात आले असून भारताने अमेरिकेचे आरोपही फेटाळले आहेत.
भारत जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत जोरदार बचाव करील, भारताला देशी उत्पादन क्षमता वाढविण्याची इच्छा आहे आणि भारताकडे ती क्षमता आहे, आता यापुढे आयात बंद करावयाची आहे, असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. सौर ऊर्जा कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणावरील सबसिडी आणि जनतेचा निधी गुंतलेला आहे आणि त्यामुळे त्याचा वापर आयातीसाठी केला जाणार नाही, असेही ते म्हणाले.